कोलकाता : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी झालेल्या हल्ल्याची झळ आता कोलकाताच्या जाधवपूर विद्यापीठापर्यंत पोहोचली आहे. जेएनयूच्या घटनेचा निषेध करणाऱ्या विद्यार्थी आणि भाजपाच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री झाली. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये सोमवारी जेएनयू हल्ल्याविरोधात जाधवपूर विद्यापीठामध्ये डाव्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. यावेळी भाजपाची रॅलीही निघत होती. या दोघांची रॅली समोरासमोर आल्याने बाचाबाची झाली. यावेळी दगडफेकही करण्यात आली. पोलिसांचे बॅरिकेडही तोडण्यात आले. या दरम्यान तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला.
जाधवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी कोलकाताच्या सुलेखा नाक्यावर अडविले होते. यावेळी एसएफआय आणि अन्य डाव्या संघटनांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आदोलनात उतरले होते. यावेळी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पोलिस उपायुक्तही तेथे उपस्थित होते.
जेएनयूमध्ये रविवारी सायंकाळी मास्कधारक हल्लेखोरांनी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह 30 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक यांना गंभीर मारहाण करण्यात आली. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच काही जणांची ओळख पटविल्याचे समजत आहे.