केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत घटस्फोटाच्या कोट्याचा लाभ मिळवण्यासाठी एका महिलेने पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या पहिल्याच वाढदिवासाच्या दिवशी या महिलेने पतीला घटस्फोट मागितला आहे. पतीने घटस्फोटाचे कारण विचारले असता, आपल्याला यूपीएससी परीक्षेत घटस्फोटित कोट्याचा लाभ मिळेल आणि यासाठीच आपण लग्न केले होते, असे तीने म्हटले आहे.
खरे तर, घटस्फोटित कोट्याचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घटस्फोट मागितला होता. मात्र तेव्हा, पती आणि इतर नातलगांनी समजावल्यानंतर प्रकरण शांत झाले होते. पण, वर्षभरानंतर पत्नीने पुन्हा पतीपासून वेगळे होण्याचा आग्रह धरला. तिच्या हट्टापुढे नातलग आणि पतीलाही नमते घ्यावे लागले आणि घटस्फोटावर सहमती झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या मंगलम सिटीमध्ये राहणाऱ्या कुणालने प्रतापगडच्या तरुणीसोबत लग्न केले होते. वर्षभरापूर्वी प्रतापगडमध्ये लग्न केल्यानंतर, नवरदेव आपल्या नातलगांसह जयपूरला पोहोचला. यानंतर दुसऱ्याच दिवशी नवरीने घटस्फोट मागीतला. दोन्ही पक्षाच्या लोकांनी कसे तरी हे प्रकरण सोडवले. मात्र, लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, दोन दिवसांपूर्वी तरुणीने पुन्हा घटस्फोट मागितला.
हुंड्याच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी - महत्वाचे म्हणजे, पतीने घटस्फोट देण्यास नकार दिल्यानंतर, पत्नीने त्याला हुंड्याचा खोटा गुन्हा आणि नातेवाईकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच घटस्फोट दिल्यास, या कोट्यात नोकरी मिळेल, असेही ती म्हणाली. तिला यूपीएससीच्या घटस्फोट कोट्यातून नोकरी मिळवायची आहे. यानंतर पती कुणालने जयपूर पोलिसांत तक्रार दाखल केली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नही. म्हणून त्याने जयपूर जिल्हा अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतर, करधनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.