नवी दिल्ली : लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी यांनी बुधवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची येथे साऊथ ब्लॉकमध्ये भेट घेतली. लष्कर प्रमुखपदासाठी सेवाज्येष्ठतेच्या निकषावर बक्षी यांचा सरकारने विचार केलेला नसल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग हे ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर जनरल बक्षी हेच लष्करात सर्वात ज्येष्ठ आहेत. तथापि, सरकारने सेवाज्येष्ठतेचा निकष दुर्लक्षित करून, लष्कर प्रमुखपदासाठी व्हाइस चीफ लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती जाहीर केली. या भेटीमध्ये बक्षी राजीनामा देणार अशी चर्चा सुरू असताना पर्रीकर व बक्षी यांची १५ मिनिटे चर्चा झाली. बक्षी यांची ही भेट शिष्टाचाराची होती. बक्षी यांनी संरक्षण मंत्र्यांना भेटण्यास वेळ मागितला होता, असे सूत्रांनी सांगितले. बक्षी यांनी लष्कर प्रमुखांचीही भेट घेतली. बक्षी आणि पर्रीकर यांच्यात काय चर्चा झाली, यावरील प्रश्नांवर संरक्षण मंत्रालय आणि लष्कराच्या प्रवक्त्याने काहीही भाष्य केलेले नाही. लष्कर प्रमुख पदासाठी सरकारने लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची निवड प्रवीण बक्षी आणि दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एम. हॅरीस यांची सेवाज्येष्ठता डावलून जाहीर केल्यानंतर राजकीय वादंग निर्माण झाले आहे तसेच लष्कर वर्तुळातही तीव्र स्वरुपाचे मतभेद व्यक्त झाले.बक्षी यांना चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ किंवा चीफ आॅफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष बनवले जाऊ शकते अशीही चर्चा आहे. अर्थात ही दोन्ही पदे सध्या अस्तित्वात नाहीत आणि इतक्या कमी वेळेत त्या निर्माण करणे शक्य नाही, असे सूत्रांनी सांगितले. यावर्षीच्या प्रारंभी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वरील दोन्ही पदांचा सरकार एकाचवेळी विचार करीत असल्याचे संसदेला सांगितले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
लेफ्ट. जन. प्रवीण बक्षी संरक्षणमंत्र्यांना भेटले
By admin | Published: December 23, 2016 1:50 AM