पाली (राजस्थान) : बालपणातच व्यसनामुळे वडिलांचे निधन झाले, घरात अठराविश्व दारिद्र्य, त्यामुळे शाळाही अर्ध्यावर सुटली. पोटाची खळगी भरण्यासाठी इतरांच्या शेतात कामाला जाणाऱ्या एका मुलीचा समाजाने बालविवाहदेखील लावून दिला. परंतु आयुष्यात आलेल्या संकटांना निडरपणे तोंड देत हीच मुलगी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी सरपंच झाली. प्रवीणा नावाची ही मुलगी सध्या मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत आहे.
राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सकदरा गावातील प्रवीणा म्हणाली, कौटुंबिक परिस्थितीमुळे बालविवाहाची मी बळी ठरली, तरी गावातील एकही मुलगी आता शिक्षणाविना राहणार नाही, याचा संकल्प केला होता. मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत असल्याने सासरच्या मंडळींनीही तिला सरपंचपदाची निवडणूक लढण्यास प्रोत्साहन दिले. सरपंच झाल्यावर गावातच मुलींसाठी शाळा उभारल्याचे प्रवीणा यांनी म्हटले.
सात पाड्यांचा सांभाळला कारभारसासरची मंडळींची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नसली, तरी त्यांनी मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी सात पाड्यांची मिळून असलेल्या गट ग्रामपंचायतीची सरपंच होऊ शकले. सध्या माझा कार्यकाळ संपला असला, तरी शिक्षणासह अन्य कामेही यापुढे सुरूच राहणार असल्याचे प्रवीणा यांनी सांगितले.