इंफाळ- जन्मदात्यांचा सांभाळ न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचं मणीपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी म्हटलं आहे. आई-वडिलांचा सांभाळ करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचं सिंह म्हणाले. आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोणतीही व्यक्ती आपल्या आई-वडिलांच्या आशीर्वादाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, असं बिरेन सिंह म्हणाले. मासिक जनता दरबारादरम्यान अनेक वृद्ध व्यक्ती त्यांच्या मुलांची तक्रार माझ्याकडे करतात. मुलं नीट सांभाळ करत नाहीत, अशी अनेकांची व्यथा असते, असं सिंह म्हणाले. 'आपल्या आई-वडिलांना योग्य वागणूक न देणारे, त्यांचा नीट सांभाळ न करणारे आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. आई-वडिलांचा आशीर्वाद असणाऱ्या व्यक्तीच त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतात,' असं सिंह यांनी म्हटलं. मात्यापित्यांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी त्यांनी यावेळी दिली. 'राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आई-वडिलांचा सांभाळ न केल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल,' असं सिंह म्हणाले. आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सिंह यांनी हा कारवाईचा इशारा दिला.
जन्मदात्यांचा सांभाळ न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार-मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 5:41 PM