नवी दिल्ली - गेल्या निवडणुकीत पंजाबमध्ये अवैध ड्रग्सच्या मुद्दावरुन राजकीय वातावरण तापल्याचे दिसून आले होते. आता काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी ड्रग्सच्या मुद्दावरुन एक विधान केले आहे. हेरॉईनपेक्षा अफू चांगले आहे, त्यामुळे पंजाबमध्ये अफूच्या शेतीला कायदेशीर मान्यता द्यायला हवी, असे धक्कादायक विधान नवज्योत सिंग सिद्ध यांनी केले आहे.
अफूची शेती कायदेशीर करण्यासाठी आप नेते धर्मवीर सिंह यांचे पंजाबमध्ये मोठे प्रयत्न सुरु आहेत. यावर बोलताना नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, धर्मवीर सिंह यांचे प्रयत्न चांगले आहेत. अफूमध्ये अनेक औषधी गुण असतात. माझे काका औषध म्हणून अफूचे सेवन करत होते. तसेच, ते चांगले जीवनही जगले, असे नवज्योत सिंग सिद्धू यावेळी म्हणाले.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचे सरकार राज्यात ड्रग्सची तस्करी करण्याऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कडक कायदा करण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारने पोलिसांसमवेत सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डोपिंग टेस्ट करण्यास बंधनकारक केले आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी ड्रग्जच्या मुद्द्यावरून काँग्रेसने विधानसभेत गदारोळही केला होता. अशा परिस्थिती काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या या विधानामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.