प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडीत बिरजू महाराज यांचे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या नातेवाईकांनी ही माहिती दिली. बिरजू महाराज यांचे खरे नाव बृजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी, १९३८ ला लखनऊमध्ये झाला होता. लखनऊ घराण्याशी संबंध असलेल्या बिरजू महाराज यांचा नातून स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली.
पंडित बिरजू महाराज हे एक गुरू, नृत्यकार, कोरिओग्राफर, गायक आणि संगीतकार होते. एवढं पुरेसं नाही म्हणून तो वाद्य वाजवायचे, कविता लिहायचे आणि चित्रं काढायचे. त्यांचे अनेक शिष्य आता सुप्रसिद्ध कलाकार आहेत आणि जगभर पसरलेले आहेत.
1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित बिरजू महाराज यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शनही केले. ज्यामध्ये उमराव जान, देढ इश्किया, बाजीराव मस्तानी या चित्रपटांचा समावेश आहे. पद्मविभूषण व्यतिरिक्त त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मान देखील मिळाला आहे. 2012 मध्ये, त्यांना विश्वरूपम चित्रपटातील नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.