नवी दिल्ली: इकडं महाराष्ट्रात महराष्ट्र कुस्ती स्पर्धेवरुन वादंग सुरू असताना तिकडं राजधानी दिल्लीत भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज कुस्तीपटू जंतरमंतरवर आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलक कुस्तीपटूंमध्ये ऑलिम्पियन बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट आणि सरिता मोर यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व कुस्तीपटू कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत.
आज तकशी बोलताना बजरंग पुनिया म्हणाले की, आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. कोणाकडून त्रास होत आहे, ? या प्रश्नावर पुनिया म्हणाले की, फेडरेशन आमच्यासमोर समस्या निर्माण करत आहे. आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचंही पुनिया म्हणाले. मात्र, यावेळी त्यांनी हा संपूर्ण लढा केवळ फेडरेशनविरोधात असल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान, कुस्तीपटून विनेश फोगट म्हणाल्या की, इथं येऊन आंदोलन करावं लागणं ही आमची मजबुरी आहे. आम्ही आपापसात बोलून चर्चा केली आणि त्यानंतरच आंदोलनाचा निर्णय घेतला. पैलवानांना अडचणी येत आहेत. आम्ही खूप दुखी आहोत, म्हणून आंदोलन करत आहोत.
ट्विटरवर व्यक्त केला विरोधया सर्व खेळाडूंनी त्यांच्या ट्विटमध्ये डब्ल्यूएफआय अध्यक्षांच्या बहिष्काराचा केला आहे. याशिवाय ट्विटमध्ये पीएमओ इंडिया, पीएम मोदी आणि अमित शहा यांना टॅगही केलं आहे. बजरंग पुनियाने ट्विट करून लिहिले की, "खेळाडू देशाला पदक मिळवून देण्यासाठी कठोर परिश्रम करतो, परंतु फेडरेशननं आम्हाला निराश करण्याशिवाय दुसरं काहीही केलं नाही. हवे ते नियम लादून खेळाडूंना त्रास दिला जातोय."
विनेशा फोगट यांनीही ट्विट केलंविनेशा फोगाटने ट्विट केलं की, खेळाडूला मान हवा आहे. खेळाडून पूर्ण समर्पणाने ऑलिम्पिक आणि मोठ्या खेळांची तयारी करतात, पण फेडरेशननं त्यांना साथ दिली नाही, उलट खच्चीकरण केलं. आता आम्ही झुकणार नाही. हक्कासाठी लढणार.