विधानसभेतून ----- एकमेकांवर नेमकोंडीचा गेम
By admin | Published: December 18, 2014 12:40 AM
विधानसभेत बुधवारी दिवसभर सत्ताधारी व विरोधकांनी वेगवेगळ्या विषयांवरून एकमेकांवर नेम साधला. या नेमबाजीत कधी विरोधकांकडून मंत्र्यांची कोंडी झाली तर कधी मंत्र्यांकडून विरोधकांची कोंडी झाली.
विधानसभेत बुधवारी दिवसभर सत्ताधारी व विरोधकांनी वेगवेगळ्या विषयांवरून एकमेकांवर नेम साधला. या नेमबाजीत कधी विरोधकांकडून मंत्र्यांची कोंडी झाली तर कधी मंत्र्यांकडून विरोधकांची कोंडी झाली. मुंबई महापालिकेने डास मारण्यासाठी निकृष्ट दर्जाच्या औषधाचा पुरवठा केलेल्या कंपनीकडून पुन्हा खरेदी करण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांनी लावून धरत शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. यामुळे शिवसेनेचेच नेते असलेले आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची सभागृहात कोंडी केली. खरेदी घोटाळ्याच्या विरोधात नारेबाजी करीत विरोधकांनी सभात्याग करून आरोग्य मंत्र्यांचा बीपी वाढविला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात त्यांच्या खात्याशी संबंधित प्रश्न एखाद्या अनुभवी मंत्र्यांप्रमाणे निकाली काढले. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली हा तालुका होऊन २२ वर्षे झाली असल्याचे सांगत, तालुक्यात उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग व उपविभागीय अभियंता सिंचन विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर ही उपविभागीय कार्यालये अद्याप सुरू झाली नसल्याचा प्रश्न काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडला. यावर २२ वर्षांपासून हा प्रश्न असताना तुम्ही मात्र आता पत्र दिले, असे सांगत त्यांनी वडेट्टीवारांवर शांत बसण्याची वेळ आणली. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात छटपूजादरम्यान नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याबाबत मुंबादेवीतील काँग्रेसचे आ. अमीन पटेल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरून सत्ताधारी आक्रमक झाले. काँग्रेसचे खासदार संजय निरुपम तेथे छटपूजा करायचे तेव्हा नियमांचे उल्लंघन झाले नाही का, असा सवाल भाजपच्या मनीषा चौधरी यांनी करीत या प्रश्नावरच आक्षेप घेतला. सत्ताधाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेपुढे विरोधकांनाच नमते घ्यावे लागले. औचित्याचा मुद्दा मांडताना आ. प्रणिती शिंदे यांनी माजी आ. नरसय्या अडाम यांच्यावर घरकूल योजनेसाठी नागरिकांकडून पैसे गोळा करीत असल्याचा गंभीर आरोप केला. माजी सदस्यावर विनापुरावा आरोप करू नये, असा आक्षेप वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेताच शिंदे यांच्या मदतीला अजित पवार, विखे पाटील धावून आले. यामुळे प्रणिती यांना बळ मिळाले. भाजपचे आकाश फुंडकर यांनी पोलीस निरीक्षकाविरुद्ध हक्कभंग सादर करीत आमदारांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. तालिबानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानातील पेशावर येथील सैनिकी शाळेवर हल्ला करून तेथील निरपराध विद्यार्थ्यांची हत्या करण्याच्या घटनेचा आज विधानसभेत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. - कमलेश वानखेडे