लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या २८ जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सत्तारूढ समाजवादी पार्टीने २३ जागांवर विजय मिळविला आहे. २०१७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्तेचा दावा करणाऱ्या भाजपला विधान परिषदेची एकही जागा जिंकता आली नाही. उर्वरित पाच जागांपैकी बसपाने दोन, काँग्रेसने एक आणि अपक्षांनी दोन जागा जिंकल्या. आठ जागांवर सपाचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. या विजयाबरोबरच उत्तर प्रदेश विधान परिषदेत समाजवादी पार्टीला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. विधान परिषदेच्या एकूण ३६ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यापैकी आठ जागांवर सपाचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे २८ जागांसाठी ३ मार्चला मतदान घेण्यात आले. दरम्यान, सत्तारूढ सपाने या निवडणुका पैसा आणि बाहुबळावर जिंकल्याचा आरोप पराभवाने निराश झालेल्या भाजपने केला आहे. (वृत्तसंस्था)
विधान परिषद; सपाचा ३१ जागांवर विजय
By admin | Published: March 07, 2016 3:02 AM