पश्चिम बंगाल विधानसभेत सोमवारी अभूतपूर्व घटना घडली आहे. बीरभूम नरसंहार प्रकरणी टीएमसी आणि भाजपा आमदार सभागृहात समोरासमोर आले. या प्रकारात विधानसभेतच दोन्ही पक्षाचे आमदार एकमेकांना भिडले. त्यात मारहाण-लाथाबुक्क्या असा प्रकार घडला. या घटनेत भाजपाचे ७ आमदार आणि टीएमसीचे एक आमदार गंभीर रित्या जखमी झाले आहेत. यातील जखमी भाजपा आमदारांना अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. तर टीएमसी आमदाराला एसएसकेएम रुग्णालयात दाखल केले आहे.
या मारहाणीत टीएमसी आमदाराचे नाकाचं हाड तुटले आहे. दोन्ही पक्षाचे आमदार एकमेकांवर मारहाणीचे आरोप करत आहेत. टीएमसी आमदार असीत मजूमदार यांच्या नाकाला गंभीर इजा पोहचली आहे. तर भाजपाचे मनोज टिग्गा, शिखा चॅटर्जी, चंदना बाउरी, नरहरी महतो, नदियार चांद बाउरी, डॉ. अजय पोद्दार आणि लक्षण गौरी यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र हॉस्पिटल प्रशासनावर टीएमसीचा दबाव असल्याचा आरोप करत जखमी आमदारांना दिल्लीच्या एम्समध्ये नेणार असल्याचं भाजपा नेते शुभेंद्रु अधिकारी यांनी म्हटलं आहे.
भारतीय जनता पार्टीने सोमवारी आरोप लावला की, पश्चिम बंगाल विधानसभेत तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी भाजपा आमदारांवर हल्ला केला. या घटनेनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर भाजपाने गंभीर आरोप केले आहेत. घडलेल्या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी माफी मागायला हवी अशी मागणी भाजपा नेत्यांकडून केली जात आहे. भाजपा महासचिव सी टी रवी यांनी ट्विटवर म्हटलं की, पश्चिम बंगाल विधानसभेत टीएमसी आमदारांनी भाजपावर आमदारांवर प्राणघातक हल्ला केला. आमच्या आमदारांची चूक काय होती? बीरभूम हत्याकांड प्रकरणी चर्चेची मागणी केली. हे टीएमसीच्या गुंडांनी केले आहे. ममता बॅनर्जी हे लोकांपासून लपवण्याचा प्रयत्न करतेय. टीएमसीमधील टी चा अर्थ तालिबान तर नाही ना? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
भाजपाचे ५ आमदार निलंबित
दरम्यान, या घटनेनंतर पश्चिम बंगाल विधानसभेमधून भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांच्यासह पाच भाजपा आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये शुभेंदू अधिकारी, मनोज तिग्गा, नरहरी महतो, शंकर घोष, दीपक बरमन यांचा समावेश आहे. त्यांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे.