ओडिशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांकडून पक्षांतर सुरु असल्याचे दिसून येते. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, ओडिशात भाजपाला जोरदार झटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ओडिशा भाजपाच्या उपाध्यक्ष लेखश्री सामंतसिंघार यांनी रविवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच लेखश्री सामंतसिंघार या बिजू जनता दलात (बीजेडी) सामील झाल्या आहेत. लेखश्री सामंतसिंघार यांनी राजीनामा देताना गेल्या दशकापासून पक्षासाठी असलेली आपली नितांत बांधिलकी आणि समर्पित सेवा व्यक्त केली. पक्षाला पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट केले. तसेच, रक्त आणि घाम गाळल्याचे लेखश्री सामंतसिंघार यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.
यापूर्वी शनिवारी माजी मंत्री रघुनाथ महंती यांनी भाजपाचा राजीनामा दिला होता. रघुनाथ महंती हे 1990 ते 2009 पर्यंत सलग पाच वेळा बालेश्वर जिल्ह्यातील बस्ता विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी आपला राजीनामा ओडिशा भाजपाचे अध्यक्ष मनमोहन सामल यांच्याकडे पाठवला आहे. रघुनाथ महंती पुन्हा एकदा नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलात सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीही ते याच पक्षात सहभागी होते.
लोकसभेच्या निवडणुका तोंडावर ज्या प्रकारे नेते पार्टी सोडत आहेत, त्यावरून ओडिशातील भाजपामधील अंतर्गत वाद स्पष्टपणे दिसत आहे. पार्टीची एकजुटता आणि नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, लेखश्री सामंतसिंघार यांनी पार्टीचा राजीनामा देणे, हे पार्टीसाठी चांगले संकेत नसल्याचे म्हटले जात आहे. तर ओडिशात भाजपासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे.
एकीकडे भाजपा ओडिशात पार्टी मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. आगामी निवडणुकीत भाजपा आपली स्थिती मजबूत करण्यात व्यस्त आहे. त्याचवेळी पक्षश्रेष्ठींतील असंतोष हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान आहे. याचा परिणाम निवडणुकीवर तसेच पार्टीच्या एकजुटीवर होऊ शकतो.