शोकांतिका! लेकींनी खाटेवरूनच आणले आईचे पार्थिव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 06:52 AM2022-03-31T06:52:52+5:302022-03-31T06:53:36+5:30
मध्य प्रदेशातील शोकांतिका : कोणीही मदत नाही केली, फक्त बघत होते
रिवा (मध्य प्रदेश) : वृद्ध आईची तब्येत बिघडल्याने तिला इस्पितळात घेऊन जाण्यासाठी कुटुंबीयांना रुग्णवाहिका बोलावली. अनेक तास वाट पाहूनही रुग्णवाहिका न आल्याने अखेर तिच्या चार मुलींनी आईला खाटेवर उचलून सामुदायिक आरोग्य केंद्रात आणले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दुर्दैवाचा फेरा एवढ्यावरच थांबला नाही. मृत आईचे पार्थिव घरी घेऊन जाण्यासाठी शववाहिका मिळाली नाही. नाईलाजाने या चार लेकी आईचे पार्थिव खाटेवर टाकून पाच किलोमीटर पायी चालत घरी परतल्या.
रिवा जिल्ह्यातील महसुआ गावातील ही शोकांतिका होय. मोलिया केवट (८०) यांची तब्येत खूपच बिघडली होती. तिला इस्पितळात नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने तिच्या चार मुलींनी खाटेवरच आईला उचलून जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन आल्या. डॉक्टरांनी नाडी तपासून तिला मृत घोषित केले. कुटुंबातील लोकांनी पार्थिव घरी घेऊन जाण्यासाठी शववाहिका मिळेल का म्हणून तेथील डॉक्टरांकडे चौकशी केली. परंतु, नकार मिळाल्याने खाटेवरच आईचे पार्थिव टाकून त्या ५ किलोमीटर पायी चालत घराकडे निघाल्या. वाटेत एक पोलीस ठाणे लागले; परंतु, कोणीही मदत केली नाही. सगळे फक्त बघत होते. मोटरसायकलने जाणाऱ्या काही लोकांनी हे मन हेलावणारे दृश्य पाहून व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर झळकावून व्यवस्थेच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले.
एखादी शववाहिका
दान करा...
जिल्हा मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. बी. एल. मिश्रा यांनी सांगितले की, त्या आरोग्य केंद्रात शववाहिका उपलब्ध
नव्हती.
व्यवस्था करण्यात वेळ लागल्याने त्या खाटेवरच मृतदेह घेऊन गावी परतल्या. संपूर्ण जिल्ह्यात एकही शववाहिका उपलब्ध नाही.
लोकांनी व्हिडीओ बनवून ते झळकावण्याऐवजी एखादी शववाहिका दान करावी, असे आवाहन डॉ. मिश्रा यांनी केले.