नवी दिल्ली : गेल्या नऊ वर्षांत देशातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी सुमारे 59 टक्क्यांनी वाढली आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद सांगितले. यासोबतच रस्त्यांच्या जाळ्याच्या बाबतीत भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2013-14 मध्ये राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी 91,287 किमी होती, जी 2022-23 मध्ये 1,45,240 किमी झाली आहे. या कालावधीत 59 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
2013-14 मध्ये राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी 91,287 किमी होती. ती 2022-23 मध्ये 1,45,240 किमीपर्यंत वाढलल्याचे गडकरी म्हणाले. या कालावधीत ही लांबी 59 टक्क्यांपेक्षा अधिक वाढली आहे. गेल्या नऊ वर्षांत चौपदरी राष्ट्रीय महामार्गांमध्ये सुमारे दुप्पट वाढ झाली आहे. 2013-14 मध्ये चौपदरी राष्ट्रीय महामार्गांची लांबी 18,371 किमी होती. जी गेल्या नऊ वर्षात 44,654 किमी झाली असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. याचबरोबर, फास्टॅग (FASTag) लागू झाल्यामुळे टोल कलेक्शनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. टोल कलेक्शनमधून मिळणारा महसूल 2013-14 मधील 4,770 कोटी रुपयांवरून 2022-23 मध्ये 41,342 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे नितीन गडकरी म्हणाले. तसेच, 2030 पर्यंत टोल महसूल 1,30,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, फास्टॅगमुळे टोलवरील प्रतीक्षा वेळही कमी झाला आहे. 2014 मध्ये टोल प्लाझावर प्रतीक्षा वेळ 734 सेकंद होता. तर 2023 मध्ये ते 47 सेकंदांपर्यंत कमी झाले आहे. आम्ही लवकरच ते 30 सेकंदांपर्यंत कमी करू अशी आशा आहे, असे नितीन म्हणाले. तसेच, ईशान्येकडील प्रदेशात महामार्गाच्या जाळ्याच्या विस्तारावर विशेष भर दिला जात आहे. या भागात 2 लाख कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्प राबवले जात आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर प्रवासाचा सुखद अनुभव देण्याच्या उद्देशाने रस्त्याच्या कडेला 670 सुविधा विकसित केल्या जात आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले.
याचबरोबर, दिल्ली रिंगरोड प्रकल्पासाठी रस्ते बांधणीत 30 लाख टन कचरा वापरला आहे. हे कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासाविषयीच्या सक्रिय दृष्टीकोनाचे द्योतक आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. अमेरिकेत 68 लाख 3 हजार 479 किलोमीटरचे रस्ते करण्यात आले आहेत. भारतात 63 लाख 72 हजार 613 किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. तर चीनमध्ये केवळ 51 लाख 98 हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे आहे, असे ते म्हणाले. तसेच, गेल्या 9 वर्षात 68,000 पेक्षा जास्त झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. तर 3.86 कोटी नवीन झाडे लावण्यात आली. एनएचआयने देशभरातील राष्ट्रीय महामार्गांलगत 1500 हून अधिक अमृत सरोवर विकसित केले आहेत, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.