नैनिताल : सुटीच्या काळात एखाद्या पर्यटनस्थळी जाण्यापूर्वीच आपण तिथे राहण्या-खाण्याची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेतो. तिथे चांगले जेवण कुठे मिळेल, याची चौकशी करतो. राहण्यासाठी चांगले हॉटेल कोणते, याबद्दलही मित्रमैत्रिणींकडे विचारणा करतो. हल्ली किमान नेटवर पाहणी करून मगच केवळ हॉटेलच नव्हे, तर त्यातील आवडलेली रुम बूक करतो. त्या हॉटेलमध्ये सर्व सुखसोयी मिळाव्यात ही अपेक्षा असते. तिथे गेलो आणि प्रत्यक्षात तशा सुविधा नसतील, तर शिव्याही हासडतो.पण मेरळहून सुट्टीसाठी नैनितालला गेलेल्या एका नवविहाहीत दांपत्याला आपल्या हॉटेल रु ममध्ये गेल्यावर धक्काच बसला. रुमची चावी उघडताच ते पार हादरले. कारण त्यांच्या स्वागताला तिथे उभा होता चक्क बिबट्या. हे ऐकून विश्वास बसणार नाही. पण ते खरेच आहे. तल्लीताल परिसरातील एका हॉटेलात ही घटना घडली आहे. सुमीत राठोड व पत्नी शिवानी यांनी सुट्टीच्या काळात नैनितालला जाण्याचा निर्णय घेतला. ते मेरठहून निघून एका सकाळी नैनितालला पोहोचले. मॅनेजरकडून आपल्या रुमची किल्ली त्यांनी ताब्यात घेतली. चावीने त्यांनी रुमचा दरवाजा उघडून ते आत शिरताच, तिथे बिबट्या येरझाऱ्या मारत असल्याचे त्यांना दिसले. आवाजाच्या भीतीमुळे रुममधून बाहेर पडणेही त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे जीव मुठीत घेऊन ते दोघे कसेबसे बेडच्या मागे लपले. जेव्हा बिबट्या वॉशरुममध्ये शिरला, तेव्हा सुमीत राठोड यांनी हिंमतीने त्याच्या मागे जाऊन दरवाजा बाहेरून बंद करून टाकला आणि हॉटेलच्या मॅनेजरला त्याची माहिती दिली.सुमीत यांनी कळवताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सर्व व्यवस्था केली होती. पण वॉशरु मच्या वेन्टिलेटरच्या खिडकीतून बिबट्याने तोपर्यंत बाहेर पळ काढला आणि तो जवळच्याच जंगलात गायब झाला. मात्र या घटनेमुळे इतर पर्यटकही घाबरून गेले. (वृत्तसंस्था)
सुटीसाठी गेलेल्या दांपत्याच्या हॉटेल रुममध्ये बिबट्या
By admin | Published: August 02, 2016 6:19 AM