नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. गावामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका बिबट्याने घरात घुसून चिमुकलीवर झडप घातल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलगी वडिलांसोबत घरामध्ये बसलेली असताना अंधाराचा फायदा घेत बिबट्याने तिला पळवून नेलं आहे. गेल्या 24 तासांत ही दुसरी घटना घडली असून गावातील दोन चिमुकल्यांचा आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बहराइच जिल्ह्यातील कतर्नियाघाट परिसरात बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. सातत्याने बिबट्या हल्ला करत आहे. सोमवारी रात्री देवतादीन यादव हे आपल्या लेकीसह घरामध्ये बसले होते. त्याचवेळी अंधाराचा फायदा घेत बिबट्या घरात शिरला आणि यादव यांची मुलगी अंशिका हिच्यावर झडप घालून तिला पळवून नेलं. तो शेताच्या दिशेने निघून गेला. वडिलांनी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण अंधार असल्याने ते शक्य झालं नाही.
देवतादीन यादव य़ांनी आरडाओरडा केल्यानंतर आजुबाजूचे ग्रामस्थ गोळा झाले आणि त्यांनी मुलीचा शोध सुरू केला. मात्र त्यांनाही मुलीचा काहीच शोध लागला नाही. त्यानंतर वनविभागाला याची कल्पना देण्यात आली. वनविभागाने शोध सुरू करून वेगवेगळ्या टीम नेमल्या आणि मुलीचा शोध सुरू केला. त्यानंतर घरापासून दूर अंतरावर मुलीच्या शरीराचे काही अवशेष मिळाले. या घटनेमुळे या मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून गावात शोककळा पसरली आहे.
वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करत आहेत. बिबट्याकडून लहान मुलांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत चालल्या असून या घटनेपूर्वी एक दिवस आधी एका सहा वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला होता. या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी गावामध्ये पिंजरे, थर्मल कॅमेरे आणि ड्रोन कॅमेरे लावले आहेत. तसेच जंगल आणि आजुबाजूच्या परिसरात तज्ज्ञांची टीम देखील तैनात केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.