नवी दिल्ली : देशात जवळपास 6 महिन्यांनंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांची (Covid Active Case) संख्या 3 लाखांपेक्षा कमी झाली आहे. रविवारी देशातील कोरोना प्रकरणांची एकूण संख्या 2,99,620 झाली होती. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry)जारी केलेल्या आकडेवारीमध्ये ही माहिती समोर आली आहे.
आकडेवारीनुसार, आता गेल्या 191 दिवसांमध्ये सर्वात कमी सक्रिय प्रकरणे आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंत म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. तत्पूर्वी, आरोग्य मंत्रालयाने सणासुदीच्या काळात लोकांनी कोरोना संसर्गापासून जागरूक राहावे असे आवाहन केले आहे.
गेल्या सलग चार आठवड्यांपासून देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट होत आहे. खरंतर, ऑगस्टमध्ये केरळमध्ये प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर नवीन प्रकरणांची संख्या वाढली होती. दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढीदरम्यान मे महिन्यात संपूर्ण देशात सक्रिय प्रकरणांची संख्या 37 लाखांच्या वर पोहोचली होती.
मे महिन्यानंतर काय झाली स्थिती?मे महिन्यापासून दक्षिण भारतातील केरळ राज्यात कोरोना रुग्णांची संख्या असामान्यपणे वाढली, परंतु इतर राज्यांमध्ये प्रकरणे सामान्य राहिली. ईशान्येसह काही राज्यांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाली होती, परंतु केरळमधील परिस्थिती चिंताजनक बनली होती. दरम्यान, संपूर्ण देशातील 55 टक्के सक्रिय प्रकरणे केरळमधील आहेत. राज्यात सध्या 1.63 लाख सक्रिय प्रकरणे आहेत.
फेब्रुवारी महिन्यासारखी परिस्थितीआता सक्रिय प्रकरणांची स्थिती जवळजवळ या वर्षी फेब्रुवारी महिन्यासारखी आहे, जेव्हा देशात दुसरी लाट सुरू झाली नव्हती. देशातील 20 राज्यांमध्ये दररोज 100 पेक्षा जास्त आणि 10 राज्यांमध्ये 100 पेक्षा कमी प्रकरणे नोंदवली जात आहेत. फेब्रुवारीमध्येही अशीच परिस्थिती होती. त्यावेळीही देशातील अर्ध्याहून अधिक प्रकरणे केरळ आणि महाराष्ट्रातील होती.
सणासुदीच्या काळात सतर्कतेचा इशारादरम्यान, देशात लसीकरणाचा वेगही अतिशय वेगाने वाढवण्यात आला आहे. परंतु लोकांना आरोग्य मंत्रालय आणि तज्ज्ञांकडून सातत्याने सतर्कतेचा इशारा दिला जात आहे की, सणांच्या वेळी सावधगिरी बाळगली पाहिजे. मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या नियमांवर भर देण्याचे म्हटले आहे. निष्काळजीपणामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक मजबूत होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.