नवी दिल्ली, दि. 19 - ऑगस्ट महीन्यातील जीएसटी रिटर्न भरण्यासाठी आता केवळ 48 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक राहिला आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 6.9 लाख करदात्यांनी जीएसटी रिटर्नचा भरणा केला आहे. आतापर्यंत 85 लाख जणांनी जीएसटी अंतर्गत रजिस्ट्रेशन केलं आहे. यापैकी 23.18 लाख नवे रजिस्ट्रेशन आहेत. तर 62.65 लाख करदाता जुन्या टॅक्स प्रणालीनुसार या नव्या करप्रणालीत सहभागी झाले आहेत. केवळ 48 तास शिल्लक असताना अवघ्या 6.9 लाख करदात्यांनी जीएसटी रिटर्नचा भरणा केला आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी रिटर्न भरण्यासाठी मोठा गोंधळ होऊ शकतो. पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे तारीख पुढे ढकलली-जीएसटीएन पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे केंद्र सरकारने जीएसटी रिटर्न भरण्याची तारीख पुढे ढकलली. तारीख पुढे गेल्यानंतरही जीएसटी रिटर्न भरणा-यांच्या संख्येत अपेक्षित वाढ झाली नाही. इंडियन एक्सप्रेसने एका अधिका-याच्या हवाल्यानुसार दिलेल्या वृत्तात सोमवारपर्यंत केवळ 6.9 लाख करदात्यांनी जीएसटी रिटर्नचा भरणा केल्याचं म्हटलं आहे. जुलैमध्ये 46 लाख करदात्यांनी केला भरणा-जीएसटी नेटवर्कमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडाच्या चौकशीसाठी सरकारने मंत्र्यांच्या समितीची स्थापना केली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारपर्यंत 3.05 लाख लोकांनी ऑगस्ट महिन्यासाठी रिटर्न भरलं आहे. तर जुलै महिन्यासाठी 46 लाख करदात्यांनी जीएसटीचा भरणा केल्याची माहिती त्यांनी दिली. GSTR-3B फॉर्म भरणं गरजेचं -ऑगस्ट महिन्यातील जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर आहे. करदात्यांना GSTR-3B हा फॉर्म भरायचा आहे. हा सिंगल फॉर्म आहे.
48 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक, केवळ 6.9 लाख लोकांनी भरला GST रिटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 2:26 PM