तामिळनाडूच्या धर्मपूरीमध्ये एक अनोखा प्रकार घडला आहे. अनेकदा लोक प्रसिद्धीसाठी नाणी घेऊन कार वगैरे खरेदीला गेल्याच्या बातम्या तुम्ही-आम्ही पाहिल्या आहेत. परंतू एका व्यक्तीने लोकांमध्ये आणि बँकांना चांगला संदेश देण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी १०-१० रुपयांची नाणी गोळा करून सहा लाखांची कार विकत घेतली आहे.
तर, विषय असा की आरबीआयने वेळोवेळी दहा रुपयांच्या नाण्यांवरून ती नाणी खोटी नाहीत. १० पेक्षा जास्त प्रकारात, चित्रांत ही नाणी चलनात आणण्यात आलेली आहेत असे सांगितले आहे. तरी देखील बँकाही स्वीकारत नाहीएत. यामुळे ज्या लोकांकडे ही नाणी आहेत, त्यांची मुले ती खेळण्यासाठी वापरत असल्याचा दावा या तरुणाने केला आहे.
वेत्रिवेल हे प्रायमरी स्कूल आणि ट्रॅडिशनल मेडिसिन सेंटर चालवितात. त्यांची आई एक दुकान चालविते. त्यांच्या दुकानात जो कोणी ग्राहक येतो ते दहा रुपयांची नाणी घेण्यास नकार देतो. यामुळे त्यांच्याकडे १० -१० रुपयांची खूप सारी नाणी जमली होती. ही नाणी घेऊन वेत्रिवेल बँकेत गेला होता. त्यांनी ती नाणी घेण्यास नकार दिला. आमच्याकडे नाणी मोजण्यासाठी कर्मचारी नाहीत असे सांगितले.
जेव्हा आरबीआयने ही नाणी खोटी आहेत, असे सांगितलेले नाही मग बँका ती घेण्यास का तयार नाहीत, असा सवाल वेत्रिवेलने केला. शेजारची मुले या नाण्यांसोबत खेळतात, त्यांना विचारले असता त्यांच्या आई वडिलांनी ती कामाची नाहीत म्हणून खेळायला दिल्याचे सांगितले.
यामुळे वेत्रिवेलने ही नाणी गोळा करण्यास सुरुवात केली. त्याने थेट कारचा शोरुम गाठला. सुरुवातीला शोरुम मालकाने नाण्यांमध्ये पैसे स्वीकारण्यास नकार दिला, परंतू नंतर तो तयार झाला. अशाप्रकारे वेत्रिवेलने एका गाडीत भरून नाण्यांच्या थैल्या शोरुममध्ये नेल्या व कार खरेदी केली. लोकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी, १० रुपयांचे नाणे बेकार नाहीय हे दाखवून देण्यासाठी आपण हे केल्याचे वेत्रिवेल म्हणाला.