जयपूर : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात १९७५ साली लागू केलेल्या आणीबाणीची कहाणी सांगणारा धडा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी केली.आणीबाणीच्या घटनेला ४३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवारी जयपूर येथील भाजपाच्या मुख्य कार्यालयात आयोजिलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आणीबाणीच्या वेळी देशात नेमकी काय परिस्थिती होती, हे विद्यार्थ्यांना कळले पाहिजे असे सांगून जावडेकर पुढे म्हणाले की, आणाबाणीविरोधातील संघर्षाला दुसरा स्वातंत्र्य लढा का म्हटले जाते हेही या धड्यातून विद्यार्थ्यांना उमजून येईल.दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात प्रकाश जावडेकर म्हणाले होते की, आणीबाणीसंदर्भात पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करावयाच्या धड्यांवर काम सुरू आहे. सध्या प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये आणीबाणीवर काही धडे आहेत. त्यांचाही फेरआढावा घेतला जाईल. आणीबाणी हा लोकशाहीवर केलेला हल्ला होता. नव्या पिढीतील लोकांना हा काळा इतिहास समजण्यासाठी आणीबाणीवरील धडे आणखी काही पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केले जातील. (वृत्तसंस्था)
पाठ्यपुस्तकांत आता आणीबाणीवर धडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 5:41 AM