पणजी : महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत असलेल्या संबंधांबाबतच्या आरोपांवरून कारवाई करण्यापूर्वी हे आरोप सिद्ध होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी येथे केले.खडसे यांना ४ सप्टेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या कालावधीत दाऊदची पत्नी महजबी शेख हिच्या मोबाइलवरून अनेक फोनकॉल्स आल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेमन यांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यानंतर मोठे वादंग निर्माण झाले आहे. रिजिजू यांनी शुक्रवारी सायंकाळी वास्को शहरात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, एकनाथ खडसे हे दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याचा केवळ आरोप करण्यात आला आहे. या आरोपाची चौकशी अजून व्हायची आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई करणार नाही असे नाही. परंतु कारवाईपूर्वी त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले पाहिजेत. खडसे यांनी मात्र आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगून फेटाळले आहेत. संबंधित दूरध्वनी क्रमांक गेल्या एक वर्षापासून वापरातच नव्हता असे त्यांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)
खडसेंविरुद्ध आरोप सिद्ध होऊ द्या - रिजिजू
By admin | Published: May 29, 2016 12:54 AM