लखनौ - कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे गेल्या 1.5 वर्षांपासून लग्न, समारंभ आणि मोठमोठ्या मेळाव्यांना बंदी घालण्यात आली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही बंदी पुन्हा कायम ठेवण्यात आली. त्यानंतर, ठराविक लोकांच्या उपस्थितीतच विवाहसोहळ्यास परवानगी देण्यात आली. महाराष्ट्रात अद्यापही लग्नसमारंभास 200 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. त्यामुळे, बंदीस्त सभागृहात मोजक्यात लोकांमध्ये हे सोहळे पार पडत आहेत. आता, उत्तर प्रदेशातील योगी सरकारने खुल्या मैदानात विवाहसोहळ्यास परवानगी दिली आहे.
योगी सरकारने लग्न आणि सामूहिक उत्सवासाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, खुल्या मैदानात लग्न समारंभ आणि सार्वजनिक सोहळ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, या मैदानाची किंवा संबंधित जागेचं क्षेत्रफळ लक्षात घेऊन या सोहळ्यांना लोकांची उपस्थिती राहिल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच, कोविड नियमावलींचे पालन आवश्यक असून सोशल डिस्टन्स आणि प्रवेशद्वारावर मदत कक्ष स्थापन्याचेही या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत 1 लाख 69 हजार 500 लोकांचे सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये, 71 जिल्ह्यात एकही कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. मात्र, 4 जनपदांवर 7 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यातील एक्टीव्ह रुग्णांची संख्या 176 एवढी आहे. आत्तापर्यंत 16 लाख 86 हजार 712 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
महाराष्ट्रातही शिथिलता, मंदिरे उडणार
महाराष्ट्रातही राज्य सरकारने शिथिलता देण्यात सुरूवात केली आहे. त्यानुसार, राज्यातील मंदिरे 7 ऑक्टोबरपासून उघडण्यात येणार आहेत. तर, 4 ऑक्टोबरपासून शाळेची घंटा वाजणार आहे. सिनेमागृहेही उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी असल्याचे दिसून येते. तसेच, वैद्यकीय तज्ज्ञांनीही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी असल्याचे म्हटले आहे.