बॉलिवूडच्या सिनेतारकांना 'कडकनाथ' कोंबड्याची मेजवानी द्या, मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 11:09 AM2020-02-24T11:09:48+5:302020-02-24T11:10:54+5:30
कडकनाथ कोंबडा आणि दाल-पनिया ही आदिवासी भागातील चविष्ट अन् फेमस डीश आहे
इंदौर - मध्य प्रदेशच्या इंदौर येथे होणाऱ्या आयफा अवॉर्ड सोहळ्यातील सिनेतारकांना कडकनाथ कोंबडी खाऊ घालण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी, झाबुआच्या कृषी विज्ञान केंद्रातील कडकनाथ अनुसंधान आणि उत्पादन योजनेच्या संचालकांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे आयफा अवॉर्डसाठी येणाऱ्या बॉलिवूडच्या तारकांना झाबुआची स्पेशालिटी असलेला कडकनाथ कोंबडा खाऊ घालावा, अशी मागणीच संचालकांनी केलीय.
कडकनाथ कोंबडा आणि दाल-पनिया ही आदिवासी भागातील चविष्ट अन् फेमस डीश आहे. आयफा सोहळ्यातील सिनेतारकांनी याची चव चाखल्यास या डीशला आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल, असे संचालकांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. कडकनाथ कोंबडा जर आयफा अवॉर्ड सोहळ्यासाठी आलेल्या सिनेतारकांना चाखायला दिला, तर आदिवासी लोकांना नवीन रोजगार उपलब्ध होतील. कारण, मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आयफा अवॉर्डला आदिवासींनना समर्पित केलं आहे. कडकनाथ कोंबड्यांमध्ये कमी प्रमाणात फॅट असते, तसेच प्रोटीन व आयरनचे प्रमाण अधिक असते, असेही पत्रात म्हटले आहे.
पर्यटनमंत्री सुरेंद्रसिंह बघेल यांनीही कृषी विज्ञान केंद्राच्या कडकनाथ कोंबडीच्या मेजवानीचं समर्थन केलंय. आदिवीसींच्या कला, संस्कृती आणि खानपान पदार्थांचेही या सोहळ्यातून ब्रँडींग व्हावे. कारण, मुख्यमंत्र्यांनी हा सोहळा आदिवासींना समर्पित केला आहे. त्यामुळे आम्ही यासाठी नक्कीच प्रयत्नशील असू, असेही बघेल यांनी म्हटलंय.