नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना विनाअडथळा संपर्क करू दिला जावा (अनइम्पिडेड कॉन्स्युलर अॅक्सेस) असे मत भारताने व्यक्त केले आहे. पाकिस्तानने जाधव यांना भारतीय अधिकाऱ्यांना भेटू देण्याची तयारी दर्शविली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी एक प्रस्तावही भारताला पाठविला आहे.भारताने आपली भूमिका स्पष्ट करताना पाकिस्तानला स्पष्ट केले आहे की, हा संपर्क, संवाद कोणत्याही अडथळ्याशिवाय असायला हवा आणि आयसीजेच्या आदेशानुसार असायला हवा. सूत्रांनी सांगितले की, भारताच्या या भूमिकेवर पाकिस्तानच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा केली जात आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले होते की, संपर्क करून देण्याच्या पाकिस्तानच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. असे सांगितले जात आहे की, पाकिस्तानने जाधव यांना संपर्क करू देण्यासाठी काही अटी घातल्या आहेत.न्यायालयाने फटकारले होतेभारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी जावध (४९) यांना पाकिस्तानच्या एका सैन्य न्यायालयाने हेरगिरी आणि विध्वंसक कारवायांच्या आरोपावरून एप्रिल २०१७ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. जाधव यांच्या शिक्षेची प्रभावी समीक्षा आणि पुनर्विचार करावा, असे आयसीजेने सांगितले होते. जाधव यांना संपर्क करू न देता पाकिस्तानने जिनेव्हा कराराचा भंग केल्याचे या न्यायालयाने म्हटले होते.