नवी दिल्ली : सैन्यातील जवानांच्या नावाने यंदाची दिवाळी साजरी करा. त्यांच्यासाठी दिवा जळू द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून केले. वाईटाचा अंत आणि भारतीयांच्या जीवनात आनंदोत्सव निर्माण करणे म्हणजेच दिवाळी आहे. अर्थात, दिवाळी हे एक स्वच्छता अभियानही आहे, असेही ते म्हणाले. आकाशवाणीवरील या कार्यक्रमातून देशभरातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मोदी म्हणाले की, प्रत्येकाच्या मनात सैनिकाबाबत प्रेम आहे. जगातील समुदायाला अंधारातून प्रकाशाकडे देणारे हे पर्व आहे. आमचे हे उत्सव शिक्षणाचा संदेश देतात. नरेंद्र मोदी अॅपवर देशातील नागरिकांनी जवानांना ज्या भरभरुन शुभेच्छा दिल्या त्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी या भाषणात केला. उघड्यावरील शौचालयाच्या मुद्यावर बोलताना मोदी म्हणाले की, सिक्कीमनंतर हिमाचलप्रदेशही आता खुल्या शौचालयातून मुक्त झाला आहे. केरळ राज्याचीही खुल्या शौचालयमुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. हरियाणा आणि गुजरातमध्ये होत असलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>मोदी म्हणाले की, इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे की, चाणक्यांनंतर देशाला एकत्र करण्याचे भगीरथ कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेल हे या एकतेसाठीच जगले. एकतेसाठीच संघर्ष करत राहिले. दरम्यान, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर अनेक सरदारांच्या कुटुंबांना संपविले गेले, याची आठवणही त्यांनी काढली.
सैन्यातील जवानांसाठी दिवा जळू द्या!
By admin | Published: October 31, 2016 7:27 AM