श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. या चकमकीदरम्यान दोन जवानदेखील जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर नवीद जटचाही समावेश आहे. जम्मू काश्मीरमधील 'रायझिंग काश्मीर' वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येत नवीद जटचा सहभाग होता.
गोळ्या झाडून बुखारींची हत्या
'रायझिंग काश्मीर'चे संपादक सुजात बुखारी यांची श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. बाईकवरुन आलेल्या तीन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. कार्यालयातून बाहेर पडत असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये बुखारी यांचा जागीच मृत्यू झाला. बुखारी यांच्या सरंक्षणासाठी असलेल्या दोन पोलिसांचाही गोळीबारात मृत्यू झाला. यापूर्वी, बुखारी यांच्यावर 2000 मध्ये हल्ला झाला होता. तेव्हापासून त्यांना संरक्षण देण्यात आले होते.
दरम्यान, गेल्या 2 आठवड्यांमध्ये जवानांनी 20 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या टॉप कमांडराचाही समावेश आहे.
काश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा
दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात शनिवारी (24 नोव्हेंबर) मध्यरात्री सुरू होऊन रविवारी सकाळपर्यंत सुरू राहिलेल्या सशस्त्र चकमकीत सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. संशयित दहशतवादीम्हणून मारल्या गेलेल्या सहांपैकी पाच जण स्थानिक युवक होते. सहावा पाकिस्तानी नागरिक असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर लगोलग करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.