शपथग्रहण करू द्या, मग सांगतो राज्यसभा सदस्यत्व घेण्याचे कारण : रंजन गोगोईं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 02:12 PM2020-03-17T14:12:06+5:302020-03-17T14:13:31+5:30
गोगोई 17 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले आहेत. निवृत्ती होण्यापूर्वी त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या खंडपीठाने आयोध्यासह इतर प्रकरणावर निर्णय दिला होता. गोगोई आता पुढील काळात राज्यसभेत दिसणार आहेत.
नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभा सदस्यत्वासाठी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले. काँग्रेसकडून गोगोई यांच्यावर कठोर शब्दात टीका करण्यात आली. तर एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी देखील गोगोई यांच्यावर निशाना साधला. आता गोगोई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर सदस्यत्व घेण्याचे कारण सांगेल, असं त्यांनी म्हटले आहे.
राज्यसभा घेण्यासंदर्भात गोगोई यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, मी उद्या दिल्लीला जाणार आहे. मला आधी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेऊ द्या. त्यानंतर मी विस्ताराने सर्व सांगेल.
गोगोई 17 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले आहेत. निवृत्ती होण्यापूर्वी त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या खंडपीठाने आयोध्यासह इतर प्रकरणावर निर्णय दिला होता. गोगोई आता पुढील काळात राज्यसभेत दिसणार आहेत.
दरम्यान माजी न्यायमूर्ती एच.आर. खन्ना हे प्रमाणिकपणा, सरकारसमोर उभं राहणे आणि कायद्याचे राज्य कायम ठेवण्यासाठी परिचीत आहेत. मात्र न्यायमूर्ती गोगोई राज्यसभेसाठी सरकारसोबत उभं राहणे आणि प्रमाणिकपणाशी तडजोड करण्यासाठी लक्षात ठेवले जातील, अशी टीका काँग्रेसनेते सिब्बल यांनी केले होती. तर ओवेसी यांनी ट्वीट करत म्हटले की, 'केलेल्या मदतीसाठी हे बक्षीस देण्यात आले आहे का ? लोकं न्यायाधीशांच्या स्वातंत्र्यावर कसा विश्वास ठेवतील ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.