अहमदाबाद : गुजरातमध्ये अटक करण्यात आलेल्या इसिसच्या संशयित अतिरेक्याशी कथित संबंध असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्यावर होत असताना आता पटेल यांनीच गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहित या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.सूरतमधून इसिसच्या दोन जणांना अटक करण्यात आल्यानंतर यावरुन राजकीय वादळ निर्माण झाले आहे. यातील एक संशयित कासीम स्टिम्बरवाला आहे. ज्याने भरुच जिल्ह्यातील सरदार पटेल हॉस्पिटलमध्ये काम केलेले आहे. पटेल हे तेथे ट्रस्टी होते. दरम्यान, राजनाथ सिंह यांना लिहिलेल्या पत्रात पटेल यांनी म्हटले की, या प्रकरणात आपले नाव ओढून भाजप आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी आपण तपास संस्थांना निर्देश देऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत.जे कोणी दोषी असतील ते मग कोणत्याही धर्माचे असोत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तुमच्या सरकारला माझा या प्रकरणी नि:संदिग्ध पाठिंबा आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले. पटेल म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न हा राजकीय विचारांचा कैदी बनू नये आणि त्याच्याआडून क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी विरोधकांची निराधार बदनामीही केली जाऊ नये.गुजरातमधील सत्ताधारी पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गंभीरपणे सुरू असलेल्या चौकशीला सिद्ध करता येणार नाहीत व बेफाम आरोप करून विस्कळीत करीत आहे, असे माझ्या लक्षात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न समोर असतो त्यावेळी राजकीय मतभेदांना दूर ठेवले पाहिजे, असे पटेल म्हणाले. दहशतवादाचे आरोप हे कायदा राबवणाºया यंत्रणांकडून व न्यायपालिकेकडून ठेवले गेले पाहिजेत कोणत्याही राजकीय नेत्याने राजकीय पक्षाच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नव्हे, असे पटेल म्हणाले.
इसिस प्रकरणात निष्पक्ष चौकशी करा, अहमद पटेल यांचे गृहमंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 3:05 AM