कोलकाता : गोव्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वजण एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहन तृणमूल काँग्रेसचे नेते व खासदार डेरेक ओब्रायन यांनी काँग्रेसला केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे. सर्व विरोधी पक्ष समपातळीवर आहेत. एकमेकांवर टीका करण्यापेक्षा एकत्र येऊन काम करूया. भाजपला हरवणे हे आपले समान लक्ष्य असायला हवे. भाजपचा मुकाबला करण्याकरिता काँग्रेस सर्व विरोधी पक्षांना कधी एकत्र आणतो याची आम्ही अधिक काळापर्यंत वाट पाहात बसणार नाही अशी टीका तृणमूल काँग्रेसने केली होती. त्यावर तृणमूलचा गोव्यात विधानसभा निवडणुका लढविण्यामागे नेमका काय उद्देश आहे असा सवाल काँग्रेसने ही विचारला होता. तृणमूलचे नेते सुखेंदू शेखर राय म्हणाले की, ममता बॅनर्जी व काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची बैठक झाली होती. त्यानंतर काँग्रेस काही हालचाल करेल यासाठी आम्ही सहा महिने वाट पाहिली.
सूर बदलला काँग्रेसमुळेच भाजपचे भविष्य सुरक्षित आहे. काँग्रेस भाजपसाठी एकप्रकारे विम्यासारखे काम करत असल्याची बोचरी टीका तृणमूलने पोटनिवडणुकांच्या निकालांपूर्वी केली होती. त्याला काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिल्याने वाद वाढला होता. मात्र आता तृणमूल काँग्रेसने आपला सूर बदलला आहे.