नवी दिल्ली : पूर्वीच्या संपुआ सरकारने अगुस्ता वेस्टलँडला हेलिकॉप्टर सौद्यातील लाच घेणाऱ्या मुख्य लाभार्थींचा शोध लावला जाईल. जे बोफोर्समध्ये शक्य झाले नाही ते अगुस्ताप्रकरणी आम्ही करून दाखवून, असे प्रतिपादन करीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी लोकसभेत केला. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची जोरदार मागणी काँग्रेसने केली. मात्र ती संरक्षणमंत्र्यांनी मान्य केली नाही. अगुस्ताप्रकरणावरील चर्चेत काँग्रेसचे खा. ज्योतिरादित्य शिंदे यांनी सत्ताधारी पक्षाचे नेते काँग्रेसवर खोटेनाटे आरोप करीत असल्याची टीका केली. सोशल मीडियावरून काँग्रेसची बदनामी केली जात आहे आणि सोशल मीडियावरील कागदपत्रांच्या आधारेच हे सारे केले जात आहे. त्यापेक्षा या प्रकरणातील तथ्ये समोर येण्यासाठी सरकारदफ्तरी असलेली कागदपत्रे सरकारने सादर करावीत, असे आव्हान त्यांनी संरक्षणंमत्र्यांना दिले. इटलीच्या न्यायालयाने गांधी परिवारापैकी कोणालाही आर्थिक लाभ मिळाला नसल्याचे आणि तसा कोणताही पुरावा आढळून आल्याचे म्हटलेले नाही. असे असूनही केले जाणारे खोटे आरोप काँग्रेस पक्ष अजिबात सहन करणार नाही. अशा आरोपांनी काँग्रेसचे नेते आणि स्वत: सोनिया गांधी घाबरून वा डगमगून जाणार नाही, असा इशाराही ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला. त्यांच्या आक्रमक भाषणाच्या वेळी भाजपाचे सदस्य वारंवार अडथळे आणत होते. मात्र त्याला न जुमानता त्यांनी भाषण पूर्ण केले. या प्रकरणात भ्रष्टाचार असल्याचे आमच्या सरकारनेच उघडकीस आणले होते, याची आठवणही त्यांनी भाजपा सदस्यांना करून दिली. या हेलिकॉप्टर सौद्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या सभात्यागादरम्यान पर्रीकर पुढे म्हणाले, सीबीआय अतिशय गंभीरपणे या प्रकरणाचा तपास करीत आहे. सत्य उघड करण्याबाबत मी तुम्हाला निराश करणार नाही, अशी मला आशा आहे. मी कुणावर आरोप केलेला नाही. कुणाचे नावदेखील घेतलेले नाही. संपुआ सरकारने अगुस्ताप्रकरणात केलेली कारवाई उत्स्फूर्त नव्हती. इटलीच्या न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाचा उल्लेख करून ते म्हणाले, गुन्हेगारी कट रचला होता, हे या निकालाने सिद्ध झाले आहे. आम्ही लवकरच याबाबतचे दस्तऐवज प्राप्त करू, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)जो आळू की भाजी खाता है, उसके गले में खाजता हैआपल्या भाषणात, खाई त्याला खवखवे या म्हणीचा वापर करताना पर्रीकर हिंदीत म्हणाले, जो आळू की भाजी खाता है, उसके गले में खाजता है. त्यांच्या या विधानांमुळे मराठी सदस्य हसू लागले. हिंदीत बटाट्याला आलू म्हणत असल्याने हिंदीभाषिक खासदारांना त्यांच्या वाक्याचा अर्थच कळला नाही. त्यामुळे हिंदी आलू नहीं, मराठी आळू, असे ते म्हणाले. त्यावर लोकसभाध्यक्षांनी अलवे की सब्जी असे सांगितले, तेव्हा सदस्यांना त्यांच्या म्हणण्याचा बोध झाला. बहती गंगा मे हाथ धोते है, असे म्हणण्याऐवजी ते धोते हुए गंगा में म्हणू लागताच, अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी त्यांना नेमकी म्हण सांगितली.
अगुस्तातील भ्रष्टाचार खणून काढू - पर्रीकर
By admin | Published: May 07, 2016 1:49 AM