नवी दिल्ली : बाल हक्क कार्यकर्ते कैैलास सत्यार्थी यांच्या चोरी झालेल्या नोबेल मानपत्राचा अखेर छडा लागला. दिल्ली पोलिसांनी हे मानपत्र शुक्रवारी संगम विहार भागातील जंगलातून जप्त केले. चोरट्यांनी सत्यार्थी यांचे दिल्लीतील घर फोडून नोबेल मानपत्र, नोबेलची प्रतिकृती आणि इतर मौल्यवान वस्तू पळविल्या होत्या. ६ फेब्रुवारीच्या रात्री ही घरफोडी झाली होती. या प्रकरणी १२ फेब्रुवारी रोजी तीन जणांना जेरबंद करण्यात आले होते. आरोपींकडून नोबेलची प्रतिकृती आणि इतर मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या. तथापि, मानपत्र सापडले नव्हते. संगम विहारच्या पाठीमागील जंगलात दोन दिवस शोधमोहीम राबवून मानपत्राचा छडा लावण्यात आला. नोबेल मानपत्राला कागदाचा क्षुल्लक तुकडा समजून चोरांनी ते जंगलात टाकून दिले होते. या मानपत्रासह इतरही काही वस्तू जंगलातून जप्त करण्यात आल्या आहेत. सत्यार्थी यांना २०१४मध्ये पाकिस्तानी बाल हक्क कार्यकर्ती मलाला युसूफझई हिच्यासोबत विभागून शांततेचा नोबेल मिळाला होता. (वृत्तसंस्था)
सत्यार्थी यांच्या नोबेल मानपत्राचा अखेर छडा
By admin | Published: March 12, 2017 1:11 AM