मॅच फिक्सिंगपासून मुक्तता करू - पांडुरंग मडकईकर यांची ग्वाही
By admin | Published: March 03, 2016 1:57 AM
पणजी : मॅच फिक्सिंगपासून पणजीवासीयांना मुक्त करू, असे प्रतिपादन आमदार पांडुरंग मडकईकर यांनी मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस पुरस्कृत युनायटेड पणजी फ्रंटचा जाहीरनामा प्रकाशनावेळी केले.
पणजी : मॅच फिक्सिंगपासून पणजीवासीयांना मुक्त करू, असे प्रतिपादन आमदार पांडुरंग मडकईकर यांनी मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस पुरस्कृत युनायटेड पणजी फ्रंटचा जाहीरनामा प्रकाशनावेळी केले. मडकईकर यांचा रोख आमदार बाबूश मोन्सेरात व भाजप नेत्यांवर होता. मोन्सेरात आणि भाजपमध्ये नेहमीच फिक्सिंग असते, असा आरोप त्यांनी याआधीही केला आहे. काँग्रेसचे उमेदवार चोरून नेले, आमिष दाखवून फोडाफोडी केली असे आरोपही त्यांनी यावेळी केले. जाहीरनाम्यात आम्ही इतरांसारखे गुलाबी चित्र उभे केलेले नाही आणि मॅगझिनसारखा जाहीरनामाही काढलेला नाही. जे काही वास्तव आहे आणि करणे शक्य आहे तेच सांगितले आहे, असे मडकईकर म्हणाले. बाबूश आणि भाजपने गेली १५ ते २0 वर्षे पणजीवासीयांची अशीच गुलाबी आश्वासने देऊन घोर फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला. पणजीत कचर्याची समस्या गंभीर आहे. बायंगिणी कचरा प्रकल्पाला स्थानिकांकडून होत असलेल्या विरोधाबद्दल पत्रकारांनी त्यांना विचारले. हा कचरा प्रकल्प तुम्ही होऊ देत नाही, असा आरोप होत आहे. त्याबद्दल काय म्हणणे आहे, असे विचारले असता बायंगिणीत कचरा उघड्यावर टाकला जात होता. त्याला आमचा विरोध आहे. केवळ पणजीचाच नव्हे तर अन्य भागातील कचरा आणून बायंगिणीत टाकला जाणार होता, ते आम्हाला मान्य नाही. केवळ पणजीच्या कचर्यासाठी ३ लाख चौरस मीटर जमीन का, असा सवाल त्यांनी केला. बायंगिणीतच का, अन्य ठिकाणीही हा प्रकल्प उभारता येतो, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)