विकास झाडे -नवी दिल्ली : २६ जानेवारीला शेतकऱ्यांच्या तिरंगा यात्रेत जवळपास १ लाख मोटारसायकल स्वार सहभागी होऊन शेतकऱ्यांना समर्थन देणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. गणतंत्र दिनी दिल्लीतील सुरक्षतेत बाधा येऊ नये म्हणून दिल्ली पोलीस आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चा झाली, त्यात शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीची पहिली बैठक पार पडली. त्यात शेतकरी प्रतिनिधी सहभागी झाले नाहीत.सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या तीन सदस्यीय समितीची मंगळवारी पहिली बैठक पार पडली. समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी सांगितले की, न्यायालयाने गठीत केलेली समिती कृषी कायद्याबाबत शेतकरी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची काय भूमिका आहे ती जाणून घेणार आहे. याबाबतचा अहवाल सर्वोच्च न्यायालयास देताना सदस्यांचे खासगी मतही मांडले जाईल. शेतकऱ्यांसोबत चर्चा करणे हे सगळ्यात मोठे आव्हान आहे; परंतु आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीच्या सीमेवर दोन लाखांवर शेतकरी थंडीच्या कडाक्यात बसले आहेत. सरकार आपल्या मागण्यांचा विचार करीत नसल्याने त्यांनी प्रजासत्ताक दिनी राजपथवर परेड काढण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी शेतकरी तयारीला लागले आहे. ५५ दिवस पूर्ण -शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ५५ दिवस पूर्ण झाले आहेत. बुधवारी मंत्रीगट आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची दहावी फेरी होणार आहे. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही. प्रत्येक बैठकीत मंत्री शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेत आहेत परंतु त्यावर सरकारची भूमिका अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही.
शेतकरी आंदोलन : केंद्र, राज्य, शेतकरी या सर्वांची भूमिका जाणून घेऊ - अनिल घनवट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 2:00 AM