जयपूर/हैदराबाद : राजस्थान व तेलंगणातील निवडणुकांच्या प्रचाराच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्याविषयी वैयक्तिक पातळीवर टीका केली. त्यांच्या उत्पन्नाची चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर विभागास संमती दिल्याने आपण आता त्या दोघांना पाहूनच घेऊ , अशी धमकी त्यांनी दिली. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील क्रिश्चियन मायकेल याला भारतात आणल्याने, या मंडळींचा सहभाग उघड होईल, असा इशाराही त्यांनी दिला.वरील दोन्ही राज्यांत शुक्रवारी मतदान होणार आहे. राजस्थानात मोदी यांनी गांधी कुटुंबावरच टीकास्त्र सोडले. आतापर्यंत त्यांनी अशी भाषा वापरली नव्हती. त्याला तेलंगणात उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्या सरकारने घोटाळा उघड होताच, त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केले होते, पण मोदी सरकारने मात्र त्या कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढले. ते का केले, याचे उत्तर मोदींनीच द्यावे, तसेच राफेल सौद्यात अनिल अंबानी यांच्या कंपनीला ३0 हजार कोटी रुपयांचे कंत्राट का दिले, त्याचेही स्पष्टीकरण द्यावे.>आम्हीच अगुस्ता वेस्टलँडला ब्लॅकलिस्ट केले होते. त्या कंपनीची तीन हेलिकॉप्टर्सही जप्त केली. त्यांची किंमत ८८६ कोटी रुपये आहे. पुन्हा अन्य हेलिकॉप्टर सौद्यात सहभागी करून घेण्यासाठी मोदी सरकारने या कंपनीला काळ्या यादीतून काढले. ही मेहरनजर का, याचे उत्तर मोदींनीच द्यावे. - रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते काँग्रेस.
राहुल, सोनिया गांधी यांना पाहून घेऊ, नरेंद्र मोदी यांचा धमकीवजा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 6:23 AM