ओडिशामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूकही होत आहे. यातच, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत युती का होऊ शकली नाही? यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, आपण ओडिशाच्या कल्याणासाठी आपल्या नात्यांचा त्याग करायलाही तयार आहोत. तसेच, आपण निवडणुकीनंतर सर्वांना समजावून सांगू की, आपले कुणाशीही वैर नाही. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
मोदी म्हणाले, 'भारतातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी आमचे चांगले संबंध आहेत आणि आम्ही लोकशाहीत वैर ठेवत नाही. आता प्रश्न आहे की, मी माझ्या संबंधांची काळजी करावी की ओडिशाच्या कल्याणाची? मी ओडिशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी मला माझ्या नात्यांचा त्याग करावा लागला तरी मी करेन. निवडणुकीनंतर मी सर्वांना समजावून सांगेन की, माझे कुणाशीही वैर नाही."
यावेळी, एका गटाने येथे कब्जा केला असल्याचे म्हणत, पंतप्रधान मोदी यांनी ओडिशा सरकारवरही थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, "गेल्या 25 वर्षांत ओडिशात कोणतीही प्रगती झालेली नाही. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे, एका गटाने ओडिशाची संपूर्ण व्यवस्थाच ताब्यात घेतली आहे. असे वाटते की, त्यांनी संपूर्ण यंत्रणेलाच बंधक बनवले आहे. यातून बाहेर पडल्यास स्वाभाविकच ओडिशाची प्रगती होईल."
मोदी म्हणाले, "ओडिशाकडे प्रचंड नैसर्गिक संसाधने आहेत. एका समृद्ध राज्यातील गरीब लोक पाहून वाईट वाटते. भारतातील समृद्ध राज्यांत ओडिशा आहे. एवढी नैसर्गिक संसाधने आहेत. तसेच, देशातील गरीब लोकांच्या राज्यातही ओडिशा आहे. याला सरकार जबाबदार आहे. यामुळ ओडिशातील लोकांना त्यांचा अधिकार मिळायला हवा. ओडिशाचे भाग्य बदलणार आहे. सरकार बदलत आहे. मी म्हटले आहे की, ओडिशातील सरकारची एक्सपायरी डेट 4 जून आहे आणि 10 जूनला भाजपचा मुख्यमंत्री ओडिशात मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल."