नवी दिल्ली - हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलकडून सातत्याने गाझावर एअरस्ट्राईक सुरू आहे. इस्त्रायलच्या या कारवाईचा परिणाम आता जगभरात दिसून येत आहे. इराण, तुर्की, पाकिस्तानसह बहुतांश मुस्लीम देशांनी इस्त्रायलविरोधात मोर्चा उघडला आहे. इस्त्रायलनं ताबोडतोब हल्ले थांबवावेत अशी मागणी केली जात आहे. इतकेच नाही तर या हल्ल्याला उत्तर म्हणून इराणमधील हिज्बुला संघटना आणि हूती विद्रोहीदेखील इस्त्रायलवर हवाई हल्ले करत आहे.
इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा व्यापारावर परिणाम झाला आहे. आता हमासची संघटना समुद्री जहाजांवर हल्ले करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या या घटनांमध्येच भारताच्या राजधानी नवी दिल्लीत इस्त्रायली दूतावास कार्यालयाच्या शेजारी एक स्फोट झाला. या स्फोटात कुणालाही नुकसान झाले नाही. परंतु पोलिसांना घटनास्थळी एक पत्र सापडले. त्यातील गोष्टी हैराण करणाऱ्या होत्या. या पत्रात इस्त्रायलविरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला. मंगळवारी दिल्लीत इस्त्रायली दूतावास कार्यालयाच्या मागील मोकळ्या बाजूस हा ब्लास्ट झाला.
दिल्लीत इस्त्रायल दूतावास उच्चभ्रू वस्ती चाणक्यपुरी इथं आहे. हा संवेदनशील परिसर असून मंगळवारी संध्याकाळी ५ वाजून १० मिनिटांनी दुतावास कार्यालयाच्या मागील बाजूल मोकळ्या जागेत जोरदार ब्लास्ट झाला. या स्फोटाचा आवाज आसपासच्या नागरिकांना ऐकायला आला. त्यात संध्याकाळी ६ वाजता दिल्लीच्या फायर ब्रिगेडला एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला आणि त्याने या ब्लास्टची माहिती दिली. इस्त्रायल दूतावासाजवळ झालेल्या या स्फोटामुळे दिल्ली पोलिसांचे विशेष पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि तपासाला सुरुवात केली.
सुरुवातीच्या तपासात हा ब्लास्ट कोणी केला, कोणत्या हेतूने केला हे स्पष्ट झाले नाही. परंतु स्फोटाशेजारी थोड्या अंतरावर एक पानी पत्र सापडले. हे पत्र इस्त्रायली राजदूताला संबोधून लिहिलं होते. या पत्रात इस्त्रायलवर रागच नसून तर बदला घेऊ अशी धमकीही दिली आहे. हे पत्र हस्ताक्षरात नाही तर टाईप केले आहे. पत्रात गाझा इथं होत असलेल्या इस्त्रायलच्या हल्ल्याबद्दलही लिहिले आहे. पोलीस या घटनेचा ३ वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहे. पहिले अखेर इस्त्रायली दूतावासाजवळ कुणी आणि का स्फोट घडवला? दुसरे, घटनास्थळापासून काही अंतरावर हे पत्र का फेकले गेले, स्फोटाचा आणि या पत्राचा काय कनेक्शन आहे? आणि तिसरे या ब्लास्टची सूचना देणारा तो अज्ञात व्यक्ती कोण? या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहे.