लखनौ : बुलंद शहर येथील लतिका बन्सल या मुलीने तिच्या आईच्या हत्येबाबत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठविल्याचे वृत्त प्रकाशित होताच उत्तर प्रदेशचे पोलीस खडबडून जागे झाले. दोन महिन्यांपूर्वीच्या या प्रकरणाची फाइल पुन्हा उघडण्यात आली, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लतिका (वय १५) आणि तिची लहान बहीण तानिया (वय ११) यांची भेट घेऊन त्यांना संरक्षणही पुरविले. या पूर्वी पोलीस लतिका आणि तानियाची आई अनू हिने आत्महत्या केल्याचे म्हणत होते. मात्र, ती आत्महत्या नसून खून आहे, असे मुलीचे म्हणणे आहे.अनू यांच्या मृत्युनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तथापि, चौकशीत अनू यांचा खून झालेला नाही, तर त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांना जाणवल्यामुळे त्यांंनी गुन्ह्याचे कलम बदलले होते. आईच्या मृत्यूच्या चौकशीबाबत मुलगी समाधानी नव्हती, असे बुलंद शहरचे मंडळ निरीक्षक धर्मेंद्र कुमार यादव यांनी सांगितले. लतिका आणि तिच्या बहिणीचे आम्ही संरक्षण करू, अशी ग्वाहीमी देतो. आम्ही त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था केली आहे, असे यादव यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)मुख्यमंत्री माझ्या पत्राला प्रतिसाद देऊन आम्हाला न्याय मिळवून देतील, अशी आशा लतिकाने एका वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केली होती. मी यापूर्वी जुलैमध्येही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले होते. या वेळी मी रक्ताने पत्र लिहिले. कदाचित, त्यामुळे त्यांना माझ्या वेदनांची तीव्रता लक्षात येईल, असे तिने म्हटले होते. काय म्हटले होते पत्रात?दोन्ही मुलीच झाल्यामुळे आईला आमच्यासमोर १४ जून रोजी जिवंत जाळण्यात आले. तुम्ही ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’बाबत बोलता, परंतु तुमच्याच क्षेत्रात एका महिलेला जिवंत जाळण्यात आले. का तर तिला दोन्ही मुलीच झाल्या. आता आम्हालाही धमक्या दिल्या जात असून, पोलीस आमच्याऐवजी आरोपींना मदत करीत आहेत. माझे वडील मनोज बन्सल यांनी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी आईची हत्या केली. कुटुंबातील सदस्यांनी आम्हाला खोलीत कोंडून माझ्या आईला पेटवून दिले, असा आरोप लतिकाने पत्रात केला आहे. लतिका आणि तिची बहीण तान्या आता आईच्या माहेरी राहतात.
मृत्यूच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र
By admin | Published: August 15, 2016 6:09 AM