नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेमुळे दिसून येते की, भारत लोकशाही देशातून हुकूमशाही राजवटीत बदलला आहे, अशी टीका नऊ विरोधी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात केली आहे. या नेत्यांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही समावेश आहे.
मनीष सिसोदिया यांना शनिवारी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. त्याच्या जामीन अर्जावर येथे सुनावणी होणार होती; मात्र न्यायालयाने जामिनावरील निर्णय १० मार्चपर्यंत राखून ठेवत त्यांना आणखी दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.
आपचे नेते आणि दिल्ल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेमुळे राजधानीसह देशातील वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. या कारवाईविरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने देशभरात विविध ठिकाणी निदर्शने केली आहेत.
ते नऊ नेते कोण?बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बीआरएस प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आरजेडी नेते तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यावतीने पत्र पाठवण्यात आले.
पत्रात काय म्हटले?पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्हाला खात्री आहे की, भारत हा लोकशाही देश आहे असे तुम्हाला अजूनही वाटते. विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात केंद्रीय एजन्सींचा मनमानी वापर दाखवतो की, आपण लोकशाहीतून हुकूमशाहीत बदललो आहोत. मनीष सिसोदिया यांना गैरव्यवहाराच्या कथित आरोपाखाली आणि तेही कोणतेही पुरावे न दाखवता अटक करण्यात आली.