नवी दिल्ली- केजरीवालांनी आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांचा राज्यसभेचा पत्ता कट केला आहे. आम आदमी पार्टीच्या संसदीय बोर्डाची आज बैठक झाली. या बैठकीत पार्टीच्या मोठ्या नेत्यांनी सहभाग घेतला होता. बैठक संपल्यानंतर मनीष सिसोदियांनी तीन नावांची घोषणा केली. बैठकीत कुमार विश्वास यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी तीन नावं देण्यात आली आहेत.संजय सिंह, अकाऊंटंट एनडी गुप्ता आणि काँग्रेस सोडून आपमध्ये आलेले उद्योगपती सुशील गुप्ता यांची नावं आपकडून राज्यसभेसाठी जाहीर करण्यात आली आहेत. आम आदमी पार्टीच्या 18 मोठ्या नेत्यांशी आम्ही बातचीत केली आहे. त्यानंतर या नावांवर एकमत झालं आहे, असं सिसोदिया म्हणाले आहेत. विशेष म्हणजे उमेदवारी न मिळण्याबाबत कुमार विश्वास यांना शेवटपर्यंत गाफिल ठेवण्यात आलं होतं.या सर्व प्रकारानंतर आप सोडून गेलेल्या नेत्यांनी आम आदमी पार्टीच्या नेत्यांवर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. आप सोडून गेलेल्या या नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आपचे माजी नेते कपिल मिश्रा म्हणाले, आपनं लीडर आणि डीलरमधल्या डीलरला निवडलं आहे. योगेंद्र यादव यांनी टि्वट करत हा प्रकार लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. तर प्रशांत भूषण यांनी आम आदमी पार्टी विनाशाच्या दिशेनं वाटचाल करत असल्याची टीका केली आहे. या प्रकारानंतर कुमार विश्वास यांच्या समर्थकांनी अरविंद केजरीवालांना लक्ष्य केलं आहे.
कुमार विश्वास यांचा राज्यसभेचा पत्ता कट, अरविंद केजरीवालांवर भडकले विश्वास समर्थक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 6:47 PM