ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. १९ - रोहीत वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येने हैदराबाद विद्यापीठातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून या विद्यापीठात दलितांना हीन वागणूक मिळत असल्याचे आरोप होत आहेत. त्याखेरीज अभाविपच्या माध्यमातून भाजपा हिंदुत्ववादी अजेंडा राबवत असल्याचा आणि डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांची गळचेपी करत असल्याचे आरोप होत आहेत. रोहीत वेमुलाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेले कथित पत्र टाइम्स ऑफ इंडियाने दिलं असून, त्याचा अनुवाद पुढीलप्रमाणे:
सुप्रभात,
ज्यावेळी तुम्ही हे पत्र वाचत असाल, त्यावेळी मी तुमच्यासोबत नसेन. माझ्यावर रागाऊ नका. मला माहित्येय तुमच्यापैकी काहीजणांनी माझी खरंच काळजी घेतली. माझी कुणाबाबतही तक्रार नाही. मला माझ्या स्वत:बद्दलच समस्या होत्या. मला वाटतं माझा आत्मा आणि शरीर यांच्यात दरी वाढत होती, आणि मी दैत्य झालो आहे. मला लेखक व्हायचं होतं. विज्ञानाचा लेखक, कार्ल सेजनप्रमाणे. आणि अखेर, मी हे एकच पत्र मी लिहू शकतोय.
मला विज्ञान, तारे, निसर्ग आवडायचे. तसंच मी लोकांवरही प्रेम करायचो. पण मला कळलं नव्हतं की, लोकांनी केव्हाच निसर्गापासून फारकत घेतलेली आहे. आपलं प्रेम कृत्रिम झालंय. आपल्या श्रद्धांना रंग चढलेत. कृत्रिम कलेद्वारे आपलं सत्यरुप जोखलं जातं. दु:खी न होता, प्रेम करणं हे खूपच कठीण होऊन बसलंय.
माणसाचं मूल्य हे त्याची ओळख व नजीकची शक्यता इतक्या कालच्या पातळीवर आली आहे. एका मताएवढी, एका आकड्याएवढी किंवा अशाच एका गोष्टीएवढी. माणसाकडे एक मन या दृष्टीने बघितलं गेलंच नाही. प्रत्येक क्षेत्रात, मग ते शिक्षणाचे असो, रस्त्यावर असो, राजकारण असो किंवा अगदी मरण व जगणं असो.
मी या प्रकारचं पत्र पहिल्यांदाच लिहितोय. शेवटच्या पत्राची पहिली वेळ. जर मी तर्क नीट मांडत नसेन तर मला माफ करा.
शक्य आहे की, हे जग संजून घेण्यात मी चूक केली. प्रेम, दु:ख, जीवन व मरण समजण्यात मी कमी पडलो. कसलीही कधी घाई नव्हती. पण मी कायम घाई करत राहिलो. जीवन सुरू करण्यासाठी अत्यंत उतावीळ झालो. काही लोकांसाठी जीवन हाच एक शाप आहे. माझा जन्म हाच एक अपघात आहे. लहानपणाच्या एकाकीपणापासून मी कधीच उभारी घेऊ शकलो नाही. माझ्या भूतकाळातलं दुर्लक्षित पोर.
या क्षणी मी दुखावलो गेलेलो नाही, मी दु:खीही नाही. मी केवळ रीता आहे. स्वत:बद्दल काही घेणंदेणंच नसलेला. हे फारच वाईट आहे आणि त्यामुळेच मी हे पाऊल उचलतोय.
माझी संभावना लोक भित्रा अशी करतिल. मी गेल्यावर कदाचित स्वार्थी किंवा मूर्खही म्हणतील. माझा मरणोत्तर कथांवर, आत्म्यांच्या कथांवर किंवा भूताखेतांवर विश्वासही नाहीये. जर माझा कशावर विश्वास असेल तर यावर आहे की मी ता-यांपर्यंत पोहोचू शकतो आणि दुस-या जगाबद्दल जाणू शकतो.
जर तुम्ही हे पत्र वाचत असताना माझ्यासाठी काही करू शकत असाल, तर मला सात महिन्यांची फेलोशिप मिळायची बाकी आहे जी, एक लाख ७५ हजार रुपये होते. मी रामजीचं ४० हजार रुपयांच्या आसपास देणं लागतो. त्यांनी ते कधी मागितले नाहीत, परंतु कृपया ते त्यांना द्यावेत.
माझा अंत्यविधी शांततेत व सुरळित व्हावा. असं वागा, जसा की मी आलो आणि गेलो. माझ्यासाठी अश्रू वाहू नका. लक्षात घ्या की जगण्यापेक्षा मला मरणात सुख आहे. 'सावलीपासून ते ता-यांपर्यंत'
उमा अण्णा, या गोष्टीसाठी तुमची खोली वापरल्याबद्दल माफ करा. ASA च्या कुटुंबातील सदस्यांनो, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलंत, परंतु तुम्हाला निराश केल्याबद्दल माफ करा. भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
अखेरचा एकदा
जय भीम
मी उपाचाराचं लिहायला विसरलोच... माझ्या आत्महत्येसाठी कुणीही जबाबदार नाहीये.
The VC and Union Ministers in Delhi have not acted fairly. This youngster was put in so much pain that he had no option but to kill himself— Office of RG (@OfficeOfRG) January 19, 2016