ऑनलाइन लोकमत -
जयपूर, दि. 10 - वसुंधरा राजे यांच्या राजस्थान सरकारने सरकारी शाळांमधील पाठ्यपुस्तकात नवा धड्याचा समावेश केला आहे. या धड्यात गाईने आई म्हणून मुलांना पत्र लिहिलेलं आहे जे मुलांना शिकवण्यात येणार आहे. हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेणारं राजस्थान सरकार एकमेव आहे ज्यांनी गाईंसाठी वेगळ मंत्रालय ठेवलं आहे.
पाचवीतील विद्यार्थ्यांना हिंदीच्या पुस्तकातून हा धडा शिकवला जाणार आहे. या धड्यात हिंदू देवतांचे फोटो देण्यात आले आहेत ज्यामध्ये गायदेखील आहे. गाईला आपली माता मानल्यास होणारे फायदे यातून सांगितले जाणार आहेत. या पत्राची सुरुवात माझ्या मुलांनो आणि मुलींनो अशी करण्यात आली आहे. 'मी प्रत्येकाला सामर्थ्य, बुद्धीमत्ता, दिर्घायुष्य, आरोग्य, आनंद आणि समृद्धी देते. जे मला माता मानतात त्यांच्यावर मी मुलांप्रमाणे प्रेम करते', असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे.
या पत्रातून गाईने समाजासाठी दिलेल्या योगदानाची माहितीदेखील देण्यात आली आहे. गोपालन (गाय) मंत्री ओताराम यांनी 'हे गाईंच्या फायद्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसंच जागरुकता निर्माण करण्यासाठी सकारात्मक पाऊल असल्याचं', म्हटलं आहे. हा धडा फक्त वाचण्यासाठी असून परिक्षेमध्ये यासंबंधी कोणतेही प्रश्न विचारण्यात येणार नाही आहेत.