मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोदींच्या या फोटोवर काँग्रेस आयटी सेलच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी खालच्या स्तराला जाऊन टीका केली. स्पंदना यांच्या या ट्विटला भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरुन उत्तर देण्यात आले आहे. तसेच, हेच का काँग्रेस प्रेमाचे राजकारण ? असा प्रश्नही दिव्या यांना विचारण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 31 ऑक्टोबर या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे लोकार्पण करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण केल्यानंतर मोदींनी पुतळ्याजवळ जाऊन त्याची बारकाईने पाहणी कली. त्यावेळी, सरदार पटेल यांच्या पायाजवळ उभे असतानाचा मोदींचा एक फोटो काढण्यात आला आहे. मोदींचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला. तर, अनेकांनी या फोटोवरुन मोदींची खिल्लीही उडवली. मात्र, काँग्रेसच्या आयटी सेलच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी मोदींची खिल्ली उडवताना अत्यंत असभ्य भाषा वापरली. दिव्या यांनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करताना, ती खाली पडलेली पक्षांची विष्ठा आहे का? असे शब्द मोदींना उद्देशून लिहिले आहेत.
त्यावर, भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर उत्तर देण्यात आले आहे. नाही, ही काँग्रेसची घटत चालेली मूल्ये आहेत, असा टोला स्पंदना यांना लगावण्यात आला. तसेच स्पंदना यांचे हे शब्द म्हणजे सरदार पटेल यांना होणारा इतिहासकालीन तिरस्कार आणि नरेंद्र मोदींविरुद्ध असलेल्या रोगाची भाषा आहे, असे भाजपचे म्हटले. तर, राहुल गांधींचे पॉलिटीकल प्रेम हेच आहे का ? असा सवालही भाजपने दिव्या यांना विचारला आहे.