पुदुच्चेरी- भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील पुदुच्चेरी या फ्रेंच वसाहतीबद्दल आपण थोडेफार ऐकून असतो. महर्षी अरविंदांचा आश्रम, फ्रेंच पद्धतीच्या इमारती आणि स्वच्छ निळाशार समुद्र अशी पुदुच्चेरीची वैशिष्ट्ये आपल्याला माहिती आहेत. पण पुदुच्चेरीला आता नवी ओळख मिळाली आहे. पुदुच्चेरीचे प्रशासन आणि पोलीस या दोन्ही महत्त्वाच्या खात्यांची सूत्रे आता महिलांच्या हाती आहेत.
1) पुदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदी दोन वर्षांपूर्वी डॉ. किरण बेदी यांची नियुक्ती करण्यात आली. पुदुच्चेरीमधील विविध प्रश्नांमध्ये त्यांनी स्वतः लक्ष घातले आहे. एखाद्या ठिकाणी अचानक भेट देऊन त्या प्रशासनातील कच्चे दुवेही उघड करत असतात.2) गेल्या आठवड्यात महिला पोलीस अधिकारी सुंदरी नंदा यांची पुदुच्चेरीच्या डीजीपी पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे केवळ पुरुषांची म्हणून म्हणवल्या जाणाऱ्या खात्यांची जबाबदारी पूर्णपणे महिला अधिकारी सांभाळणार आहेत.3) त्याचबरोबर सिनियर सुपरिटेंडंट ऑफ पोलीस (एसएसपी) पदावरती अपूर्वा गुप्ता तर सुपरिटेंडंट ऑफ पोलीस या पदावरती डॉ. रचना सिंग कार्यरत आहेत.
4) पुदुच्चेरीच्या आयकर विभागाच्या प्रमुख आयुक्त म्हणून जहानझेब अख्तर आणि कोस्ट गार्डच्या असिस्टंट कमांडरपदी अक्षिता शर्मा काम पाहात आहेत. याचाच अर्थ सागरी सुरक्षा, आयकर, पोलीस अशा सर्व महत्त्वांच्या खात्यांमध्ये वरिष्ठ अधिकारीपदी महिला असतील. अक्षिता शर्मा या जम्मू काश्मीर राज्यातून कोस्टगार्डसाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
5) पुदुच्चेरी प्रशासनात पद्मा जयस्वाल या आयएएस अधिकारीसुद्धा कार्यरत आहेत6) पुदुच्चेरीच्या समाजकल्याण खात्याच्या सचिवपदी अॅलिस वाझ कार्यरत आहेत.
7) 30 सदस्यांच्या पुदुच्चेरी विधानसभेत 4 महिला आहेत.