सरकारी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ येत्या ४ मेला जारी होणार आहे. पुढे पाच दिवस या आयपीओसाठी बोली लावता येणार आहे. इकडे गुंतवणूकदार खूश आहेत, तिकडे पॉ़लिसीधारक खूश आहेत. परंतू ग्रे मार्केटमध्ये फारसे आनंदाचे वातावरण नाहीय. यावरूनच साऱ्या वातावरणाचा अंदाज येत आहे. (LIC IPO GMP)
एलआयसी आयपीओ ३ ते ५ टक्क्यांच्या प्रमिअमवर ट्रेड करत आहे. यावरून हा बहुप्रतिक्षित आयपीओ फारसा फायदा देणार नाही असे संकेत मिळत आहेत. ९००- १००० रुपयांच्या या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये २५ रुपये अधिकचे मिळत आहेत. याची माहिती आजतकने दिली आहे. जर ग्रे मार्केटचा ट्रेंड ओपन मार्केटमध्ये दिसला तर एलआयसी आयपीओची लिस्टिंगमध्ये फारशी वाढ होणार नाही. म्हणजेच गुंतवणूकदारांना एवढी मोठी कमाई होणार नाही.
केंद्र सरकारने याच आठवड्यात सोमवारी सेबीकडे एलआयसी आयपीओचा सुधारित ड्राफ्ट सादर केला होता. सेबीकडून अद्ययावत डीआरएचपीला मंजुरी मिळाल्यावर मंगळवारी एलआयसी बोर्डाची बैठक झाली होती. यामध्ये प्राईज बँड, इश्यू डेट, रिझर्व्हेशन, डिस्काऊंट आणि लिस्टिंग डेटसारख्या महत्वाच्या गोष्टींवर निर्णय़ घेण्यात आला होता.
या आयपीओची सर्वात महत्वाची बाब म्हणजे या आयपीओद्वारे काही शेअर्स हे पॉलिसीधारकांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. म्हणजेच सामान्य पॉलिसीधारकही या आयपीओतून शेअर्स घेऊ शकणार आहे. LIC च्या या आयपीओचा प्राईस बँड 902 रुपये ते 949 रुपये ठरविण्यात आला आहे. एक लॉट १५ शेअरचा असणार आहे. रिटेल गुंतवणूकदार आणि एलआयसी कर्मचाऱ्यांना या आयपीओतून प्रति शेअर ४५ रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे. तर पॉलिसीधारकांना प्रति शेअर ६० रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे. या आयपीओची इश्यू साईज ही २१ हजार कोटी रुपयांची आहे. आयपीओद्वारे 22.14 कोटी शेअर्स विकले जाणार आहेत.