नवी दिल्ली : कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या एअर इंडियाच्या नरिमन पॉइंट येथील मुख्यालयाची २३ मजली इमारत विकण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि महाराष्ट्र सरकारने ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी निविदा दाखल केल्या आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) योगक्षेम हे कार्यालय आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्रालय या इमारतीपासून जवळच आहे.एअर इंडियाची इमारत खरेदी करण्यासाठी निविदा भरल्याच्या वृत्तास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे. ही मालमत्ता खरेदी करण्यात सुरुवातीला रस दाखविणाऱ्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) निविदा भरलेली नाही.प्रचंड तोटा सहन करीत असलेल्या ‘महाराजा’ने १० डिसेंबर रोजी आपले मुख्यालय विकण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. या निविदा फक्त सरकारी संस्थांसाठीच खुल्या होत्या. ३१ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत होती. उड्डयन सचिव आर. एन. चौबे यांनी सांगितले की, ‘एलआयसी आणि महाराष्ट्र सरकार अशा दोनच निविदा आल्या आहेत.’१५00 कोटी रुपये मिळवण्याचा प्रयत्नएअर इंडियाच्या विक्रीचा प्रयत्न सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला केला होता. तथापि, एकही निविदा न आल्यामुळे तो फसला होता. त्यातुलनेत एअर इंडियाची इमारत भाग्यवान ठरली आहे. इमारतीसाठी किमान दोन निविदा तरी आल्या आहेत. दोन निविदांसह विक्री प्रक्रिया पूर्ण करणार की, निविदांना आणखी मुदतवाढ देणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही. ही इमारत विकून १,५०० कोटी रुपये उभे करण्याची एअर इंडियाची अपेक्षा आहे.
एअर इंडिया मुख्यालयाच्या खरेदीसाठी एलआयसी, महाराष्ट्र सरकार इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 1:28 AM