पुणे : “लसींसाठी परवानग्या मिळवताना पूर्वी खूप त्रास व्हायचा आणि वेळही लागायचा. मोदी सरकारच्या काळात ‘लायसन्स राज’ला आळा बसला आहे. कोविशिल्ड लसीला तातडीने परवानगी मिळाल्याने उत्पादन वेगाने करणे शक्य झाले” असे प्रतिपादन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी केले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे डॉ. सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने शुक्रवारी गौरविण्यात आले. या वेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, टिळक स्मारक मंदिरचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणिती टिळक या वेळी उपस्थित होते. डॉ. पूनावाला म्हणाले, “लोकमान्य टिळक हे द्रष्टे स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार घेताना खूप आनंद होत आहे. सन १८८९ मध्ये लोकमान्य टिळक यांनी लस उत्पादनाचे मोठे केंद्र पुण्यात व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे स्वप्न ‘सिरम’च्या रूपात साकार झाले. सन १९६६ मध्ये सुरू झालेली छोटी कंपनी ते जगातील सर्वाधिक लस उत्पादन करणारी कंपनी हा प्रवास अभिमानाचा आहे. मी हा पुरस्कार माझ्या पत्नीला समर्पित करतो.” सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘मेरे बहाद्दर’ असे म्हणत लोकमान्य टिळकांनी सायरस पूनावाला यांना मिठी मारली असती. “ज्ञानाची जिज्ञासा, अपार मेहनत यांचे फळ म्हणजे पूनावाला यांचे आजचे यश आहे. पुणे हे संशोधनाचे माहेरघर होय, हे पूनावाला यांनी दाखवून दिले.
मोदींच्या काळात ‘लायसन्सिंग राज’ला आळा- डॉ. सायरस पूनावाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 8:59 AM