नवी दिल्ली - गेल्या आठवड्यात जिवंत बाळाला मृत घोषित करणा-या दिल्लीमधील शालीमार बाग येथी मॅक्स हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दिल्ली सरकारने कडक कारवाई करत या गंभीर चुकीसाठी रुग्णालयाचा परवानाच रद्द केला आहे. केजरीवाल सरकारमधील आरोग्य मंत्रालयाने ही कारवाई केली. आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी परवाना रद्द केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता रुग्णालयात कोणत्याही नवीन रुग्णाला भर्ती केलं जाऊ शकत नाही. याआधी रुग्णालयाने नवजात जुळ्या बाळांना मृत घोषित करणा-या डॉक्टरांवर कारवाई करत त्यांचं निलंबन केलं होतं. 1 डिसेंबरला ही घटना समोर आली होती.
रुग्णालयाने जन्माला आलेली जुळी मुले मृत असल्याचं सांगत चक्क प्लास्टिकच्या पिशवीत बंद करुन सोपवली होती मॅक्स हॉस्पिटलमध्ये महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. यामधील एक मुलगा होती तर दुसरी मुलगी. प्रसूतीदरम्यान मुलीचा मृत्यू झाल्याचं कुटुंबियांना सांगण्यात आलं होतं. जुळ्या बाळांचा जन्म झाल्यानंतर त्यामधील एक बाळ जिवंत असून त्याची खूप काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं. बाळाला नर्सरीमध्ये ठेवण्याचा सल्ला कुटुंबाला देण्यात आला. नेमकं काय करायचं यावर कुटुंबिय चर्चा करत असतानाच, दुस-या बाळाचाही मृत्यू झाला आहे असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं.
रुग्णालयाने दोन्ही बाळांचा मृतदेह एका कागद आणि कपड्यात गुंडाळला, आणि चिकटपट्टी लावून एका प्लास्टिकच्या पिशवीतून नातेवाईकांकडे सोपवला. बाळांना मृत घोषित केल्यानंतर कुटुंब अंत्यसंस्कारासाठी जात असताना एक बाळ हालचाल करत असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी तात्काळ काश्मीरी गेट परिसरातील रुग्णालयात धाव घेतली. तिथे बाळ जिवंत असल्याचं सांगण्यात आलं. बाळाला तात्काळ जवळच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण दुर्देवाने त्या बाळाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बाळाचे वडिल आशिष यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारींमध्ये अनेक खुलासे झाले होते. रुग्णालयात नवजात बाळाला नर्सरीमध्ये ठेवण्यासाठी 50 लाखांची मागणी केली होती असा दावा त्यांनी केला होता.