ठाणे, दि. 22 - लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्या जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, एनआयए कोर्टाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तळोजा कोर्टातून आज प्रसाद पुरोहित यांची सुटका होऊ शकते. मालेगाव येथे सप्टेंबर २००८मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितना सुमारे नऊ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अखेर जामीन मंजूर केला.
एटीएस विशेष न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर कर्नल पुरोहित यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. न्या. आर. के. अगरवाल व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने ते मंजूर करून एक लाख रुपयांचा जामीन मंजूर केला. न्यायालयात हजेरी लावणे, तपासात सहकार्य करणे, साक्षी-पुराव्यांमध्ये ढवळाढवळ न करणे, पासपोर्ट जमा करणे व पूर्वानुमतीशिवाय देश सोडून बाहेर न जाणे अशा अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला.
खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत पुरोहित निलंबितच राहतील, पण आता जामीन मिळाल्याने, त्यांना लष्कराच्या एखाद्या आस्थापनेशी औपचारिकपणे ‘अटॅच’ केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
या कारणांमुळे पुरोहित ‘बाहेर’एनआयएने सादर केलेले पुरवणी आरोपपत्र आणि महाराष्ट्र एटीएसने दाखल केलेले मूळ आरोपपत्र यातील तफावत, खटला लवकर संपण्याची शक्यता नसणे आणि पुरोहित यांचे आठ वर्षे आठ महिने तुरुंगात असणे या बाबी जामीन देताना न्यायालयाने नमूद केल्या. तपासी यंत्रणेला तपास करण्याचा अधिकार असला तरी आरोपीच्या स्वातंत्र्याचा एका मर्यादेपलीकडे अनाठायी संकोच केला जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले.
मालेगाव स्फोटातील आरोपींबाबत आस्ते धोरण स्वीकारा, असे आपणास सांगण्यात आल्याची तक्रार काही काळापूर्वी सरकारी वकील अॅड. रोहिणी सालियन यांनी केली होती. त्यानंतर त्या या खटल्यातून बाहेर पडल्या होत्या.
जामीन मिळताच तळोजा कारागृहासमोर गर्दीतळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांची सुटका होणार असल्याची माहिती मिळताच दुपारी एकपासून प्रसार माध्यम आणि नागरिकांनी कारागृहासमोर गर्दी केली होती. दस्तावेजाची पूर्तता न झाल्याने पुरोहित यांची सुटका एक दिवस लांबली.