मोतीलाल व्होरा यांचे आयुष्य हे जनसेवेचे आदर्श उदाहरण- सोनिया गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 07:51 AM2020-12-22T07:51:31+5:302020-12-22T07:51:54+5:30
Sonia Gandhi : सोनिया गांधी यांनी सांगितले की, त्यांनी केलेले नि:स्वार्थ कार्य व बहुमोल मार्गदर्शन यांची उणीव यापुढे आम्हाला नेहमीच जाणवत राहिल.
नवी दिल्ली : मोतीलाल व्होरा यांचे आयुष्य हे जनसेवा व काँग्रेसच्या विचारांप्रती असलेली निष्ठा यांचे आदर्श उदाहरण होते असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. मोतीलाल व्होरा यांच्या निधनामुळे छत्तीसगढ सरकारने सोमवारपासून २३ डिसेंबरपर्यंत तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
सोनिया गांधी यांनी सांगितले की, त्यांनी केलेले नि:स्वार्थ कार्य व बहुमोल मार्गदर्शन यांची उणीव यापुढे आम्हाला नेहमीच जाणवत राहिल.
मोतीलाल व्होरा यांच्या निधनामुळे छत्तीसगढ सरकारतर्फे पाळण्यात येणाऱ्या तीन दिवसांच्या दुखवट्यात शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणले जातील. या कालावधीत कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नाही. मोतीलाल व्होरा हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते.
कुशल प्रशासक असलेले नेता : विजय दर्डा
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी म्हटले आहे की, काँग्रेसची पाळेमुळे जनमाणसात घट्ट रुजविण्यात मोठा हातभार असलेले ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांच्या निधनाने मला मोठा धक्का बसला आहे. आमचे बाबूजी, स्वतंत्रता संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्यासमवेत मोतीलाल व्होरा यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. मोतीलाल व्होरा यांनी माझ्या राजकीय जीवनात केलेले मार्गदर्शन व दिलेले अपार प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. व्होरा यांच्याशी राजकीय विषयांवर माझ्या प्रदीर्घ चर्चा होत असत. ते एक कुशल प्रशासक व काँग्रेसचे सच्चे, समर्पित अनुयायी होते. ९० वर्षे वय झाल्यानंतरही मोतीलाल व्होरा दररोज काँग्रेस मुख्यालयात येऊन कामकाज पाहत असत. ते अनेक वर्षे काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते. मोतीलाल व्होरा यांनी गांधी घराण्याच्या इंदिरा गांधी यांच्यापासून राहुल गांधींपर्यंतच्या तीन पिढ्यांपर्यंत काँग्रेस पक्षाचे काम केले. आपल्यावरील जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे निभावल्या. मोतीलाल व्होरा या सत्पुरुषाच्या आत्म्याला सद्गती लाभो. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.
काँग्रेसचे एकनिष्ठ अनुयायी : राजेंद्र दर्डा
लोकमत मीडिया ग्रुपचे एडिटर इन चीफ व माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी म्हटले आहे की, मोतीलाल व्होरा हे काँग्रेसचे एकनिष्ठ अनुयायी होते. महाराष्ट्रात मी ज्यावेळी मंत्री होतो, त्यावेळी ते काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी होते. आम्ही केलेल्या कामांचा ते नित्यनियमाने आढावा घेत असत. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.