ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 18 - एका ऑनलाइन मार्केटिंग साइटवर सोफा विक्री संदर्भात खासगी माहिती एकमेकींसोबत शेअर करणं दोन तरुणींसाठी वरदान ठरलं आहे. त्यामुळे दोघींचंही आयुष्य उद्धवस्त होता-होता वाचले आहे. याशिवाय या दोघींना फसवणा-या एका व्यक्तीचाही पर्दाफाश झाला आहे. हा व्यक्ती तरुणींना आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळात ओढून लग्नाचं आमिष दाखवायचा आणि त्यांच्या पैशांवर ऐशोआरामात जगायचा.
एका सॉफ्टवेअर फर्ममध्ये काम करणारा मुरारी जनाका (36), तरुणींसोबत प्रेमाचे नाटक रचून त्यांचे पैसे स्वतःच्या मजा-मस्तीवर उडवायचा. पण म्हणतात ना, तुम्ही निष्पापांना जास्त वेळ फसवू शकत नाही. सत्य कधीतरी समोर येतेच. अगदी तसंच झालं. या ठगाचा कारनामा समोर आला तो एका ऑनलाइन मार्केटिंग साइटमुळे. अगदी फिल्मी अंदाजात त्याचं बिंग फुटलं. महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही तरुणींचं आयुष्य उद्धवस्त होण्यापासून वाचलं.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरामांगला परिसरात राहणारी आदिती वर्माने (30) ऑनलाइन मार्केटिंग साइटवर सोफ्याची विक्री करण्यासाठी खासगी माहिती शेअर केली. यावेळी सिंधू नावाच्या तरुणीनं सोफा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर दोघी संपर्कात आल्या. यादरम्यान, सिंधूचा व्हॉट्स अॅप प्रोफाईलवरील फोटोमध्ये असलेल्या व्यक्तीला पाहून आदितीला धक्काच बसला. हा तोच व्यक्ती होता मुरारी, ज्यासोबत आदितीचे प्रेमसंबंध होते.
आदितीने याबाबत सिंधूला विचारल्यानंतर तिने सांगितले की, ते दोघं लग्न करणार आहेत. यानंतर आदितीने मुरारीच्या खोटेरडेपणाबाबत तिला माहिती दिली. मुरारीने आपल्यासोबत प्रेमाचे नाटक करुन विश्वासघात केल्याचे दोघींच्याही लक्षात आले. जरासाही वेळ न घालवता दोघींनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसात तक्रार झाल्याची माहिती मिळताच मुरारी फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.
आदितीने सांगितले की, तिची आणि मुरारीची ओळख तीन वर्षांपूर्वीची. मैत्रीनंतर दोघांमध्ये प्रेमाचे नाते निर्माण झाले. यादरम्यान, मुरारीने भावनिक ब्लॅकमेल करुन तिच्याकडून 1 लाख रुपये उकळले. त्याचे दुस-या मुलींसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन मी नाते संपुष्टात आणले. मात्र काही काळानंतर त्याने पुन्हा फोन करायला सुरुवात केली आणि माफी मागितली. यानंतर पुन्हा आमचे प्रेमसंबंध जुळून आले.
पण त्याची फसवाफसवी जास्त काळ टिकू शकली नाही. ऑनलाइन सोफा विक्रीमुळे आदिती आणि सिंधू एकमेकींच्या संपर्कात आल्या, आणि यामुळे मुरारीच्या कारनामांचा पर्दाफाश झाला.